वर्धा : देशभर स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले़ यात शहरे, गावे स्वच्छ करण्याकरिता प्रशासन सज्ज झाले होते़ जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले; पण जनजागृतीचा अभाव व प्रशासकीय उदासिनतेमुळे ते दिवसांपूरतेच मर्यादित झाल्याचे दिसते़ फलकांचा गाजावाजा करीत ‘क्लीन अप’चा नारा देण्यात आला़ यासाठी प्रजासत्ताक दिनी मुहूर्तही शोधण्यात आला; पण शहरातील हे अभियान दिवसापूरतेच ठरले़ सध्या शहरासह सभोवताल कचऱ्याचेच साम्राज्य दिसते़ यामुळे ‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’ झाल्याचेच दिसते़जिल्हा प्रशासन, नगर परिषद, सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते़ एकाच दिवशी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला़ यात बजाज चौकातील भाजी बाजार, गोल बाजार, मुख्य मार्ग तसेच शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये यासह अन्य परिसरातही स्वच्छता अभियान राबविले गेले़ यात जागोजागी फलकही लावण्यात आले; पण स्वच्छता दिवसापूरतीच ठरली़ एकाच दिवसात विविध ठिकाणी साफसफाई करण्यात आली; पण जनजागृती करण्यात आली नाही़ यामुळे नागरिकांना पाहिजे तसा सहभाग मिळाला नाही़ सध्या शहरातील मुख्य भाजी बाजार, गोलबाजार व शहराच्या सभोतालचा परिसर अस्वच्छच दिसतो़ जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे़ या भागातील नाल्यांमध्ये बेशरम वाढलेली असून या परिसराला स्वच्छता अभियान शिवलेच नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)
‘क्लीन अप’ वर्धा ‘फेल’च
By admin | Published: April 01, 2015 1:50 AM