नागरिकांची मागणी : साधे अॅफिडेव्हीटही तयार होत नसल्याने संतापलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : प्रशासकीय कामे पारदर्शक व्हावी म्हणून शासनाने जवळपास सर्वच सेवा आॅनलाईन केल्या आहेत. यामुळे नागरिकांना तत्पर सेवा मिळणे अपेक्षित होते; पण याचा उलट परिणाम झाला आहे. पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयात आता कुठलीही कामे होत नाही. साधे अॅफीडेव्हीटही होत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. हे नायब तहसीलदार कार्यालय बंदच का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुलगाव हे देवळी तालुक्यातील मोठे शहर आहे. नगर परिषद असून अनेक शासकीय कार्यालये येथे आहेत. शाळा, महाविद्यालये असल्याने ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी येथे शिक्षणाकरिता येतात. या विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांकरिता नायब तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो; पण या कार्यालयात कुठलीही कामे होत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील दीड महिन्यांपासून येथील नायब तहसीलदार जागेवर राहत नाही. शिवाय त्यांची ‘डिजिटल स्वाक्षरी’ अद्याप तयार झाली नाही. यामुळे प्रत्येक कागदावर सही घेण्याकरिता देवळीचे तहसीलदार कार्यालय गाठावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना प्रत्येक प्रमाणपत्राकरिता किमान १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र शासनाने आॅनलाईन केले आहे. यामुळे ते विनाविलंब मिळणे अपेक्षित असते; पण ते प्रमाणपत्रही तब्बल १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत प्राप्त होत नाही. परिणामी, संबंधित कार्याची मुदत संपल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त होत असल्याचे दिसते. यासाठी शहरात काही सेतू केंद्र देण्यात आले आहेत. या केंद्रांतूनही विविध प्रमाणपत्र विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. पुलगावच्या नायब तहसीलदार कार्यालयात साध्या अॅफीडेव्हीटवरही सह्या होत नसल्याने नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. नायब तहसीलदार कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात नागरिकांची लूट केली जाते. उत्पन्नाच्या दाखल्याची साधी अतिरिक्त प्रिंट पाहिजे असल्यास ५० रुपये आकारले जातात. अन्य प्रमाणपत्रांसाठीही अतिरिक्त रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. पुलगाव नायब तहसीलदार कार्यालयाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा व तहसील प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. कारभार सुरळीत न झाल्यास आंदोलनपुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयाचा कारभार सध्या ढेपाळला आहे. नागरिकांना प्रत्येक कामासाठी देवळी येथील तहसीलदार कार्यालय गाठावे लागते. साधे अॅफीडेव्हीटही करायचे झाल्यास नायब तहसीलदार सहीसाठी उपलब्ध राहत नाही. नायब तहसीलदार कार्यालयातील या कारभारात येत्या आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाचणगावचे पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल यांनी दिला आहे. कार्यालयात आलबेलपुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयात सर्वत्र आलबेल कारभार सुरू आहे. कधी कर्मचारी असतात तर अधिकारी राहत नाही. नागरिकांना आपल्या कामांसाठी बराच वेळ ताटकळावे लागत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.सर्व प्रमाणपत्रे आता आॅनलाईन आहेत. यामुळे अशी समस्या यायला नको. सध्या सुटीवर असून कार्यालयात चौकशी करते. काही गैर आढळल्यास कारवाई केली जाईल.- तेजस्वीनी जाधव, तहसीलदार, देवळी.
पुलगावचे नायब तहसीलदार कार्यालय बंद करा
By admin | Published: July 10, 2017 12:53 AM