लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल वानखेडे यांना बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गाठे यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समितीने शुक्रवारी, २२ नोव्हेंबर रोजी बालरोग विभाग गाठून वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. बंदद्वार चौकशी सुरू असतानाच बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय गाठे यांचा पारा वाढल्याचेही सांगण्यात आले. बंदद्वार चौकशीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आला आहे.
कारणे दाखवा नोटीस देण्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांनी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभाग गाठून बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय गाठे व त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले; पण चौकशी सुरू असतानाच चौकशी समितीद्वारे विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. गाठे यांचा पारा चांगलाच वाढला होता. अशाही परिस्थितीत चौकशी समितीतील अधिकाऱ्यांनी बालरोग विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या महिला-पुरुष वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
विद्या पवार यांची चौकशीत गैरहजेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून प्रारंभी तीन तर नंतर पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. पाच सदस्यीय चौकशी समितीत अध्यक्ष म्हणून देवळीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे तर सदस्य म्हणून प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मनीषा नासरे, नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. मनोज सक्तेपार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, सहायक अधीक्षक पी. एस. वडणारे यांचा समावेश आहे; पण शुक्रवारी प्रत्यक्ष चौकशीच्या वेळी डॉ. विद्या पवार (सोनवणे) या गैरहजर राहिल्याची माहिती आहे.