वर्धा, सेवाग्राम, पुलगाव, भूगाव येथील प्रकार : रेल्वे पोलिसांचे होतेय दुर्लक्षवर्धा : रेल्वेच्या प्रवासात वर्धा, सेवाग्राम ही रेल्वे स्थानके महत्त्वपूर्ण आहे; पण या स्थानकांदरम्यान थांबलेल्या वा धीम्या गतीने चालणाऱ्या मालगाड्यांतील कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पुलगाव, भूगाव येथेही सर्रास कोळसा चोरी होत असल्याचे दिसून येते. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.नागपूर ते बडनेरा दरम्यान असलेल्या सिंदी रेल्वे, सेवाग्राम, वर्धा, भूगाव, दहेगाव, कवठा, पुलगाव आदी रेल्वे स्थानकांवर मालगाड्या थांबून असतात. काही गाड्या मधेही थांबविल्या जातात. यातील कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्या थांबल्यास दहेगाव, कवठा, पुलगाव, भूगाव आणि वर्धा ते सेवाग्राम दरम्यान मुले, महिला कोळशाची चोरी करतात. मुले थेट गाडीवर चढून तेथील कोळसा काढून घेतात. अनेक ठिकाणी धिम्या गतीने चालणाऱ्या मालगाडीमध्ये चढून मुले कोळखा खाली फेकतात. यानंतर महिला वा तीच मुले परत येऊन तो कोळसा गोळा करतात. हा कोळसा प्लास्टिक पोत्यांमध्ये भरून घरी वा विकण्याकरिता नेला जातो. हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. पुलगाव रेल्वे स्थानकावर दररोज प्लास्टिकचे पोते घेऊन जाणाऱ्या महिला आढळून येतात. यात कोळसा भरलेला असतो. काही ठिकाणी या कोळशावर गरीब कुटुंबाची चुल पेटते तर काही मुले कोळसा विकून मद्यपान करीत असल्याचेही आढळून येते. हा प्रकार गत कित्येक दिवसांपासून सुरू आहे. रेल्वे पोलिसांची सोय नसलेल्या स्थानकांवर हा प्रकार अधिक दिसतो. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)चोरीच्या कोळशावर पेटतात अनेकांच्या चुलीवर्धा ते पुलगाव तसेच भूगाव परिसरात कोळशाची चोरी होत असून त्यावर अनेक घरांतील चुली पेटत असल्याचे वास्तव आहे. काही रेल्वे स्थानकांवर दररोज महिला कोळसा घेऊन जाताना आढळून येतात. काही भागात चोरटी मुलेही सक्रिय असल्याचे दिसते. रेल्वेचे लोखंड आणि कोळसा चोरून ही मुले मद्यपान तसेच अन्य व्यसन पूर्ण करीत असल्याचे दिसून येते. रेल्वे पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी व रेल्वेचे नुकसान टाळावे अशी मागणी होत आहे.
मालगाडीतून सर्रास चोरला जातोय कोळसा
By admin | Published: July 15, 2015 2:45 AM