सेलू : तालुक्यात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अकाली पावसानंतर किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सीअसपेक्षा खाली आला आहे. या प्रतिकुल हवामानाचा अनिष्ट परिणाम केळीच्या मृग व कांदेबागावर झाला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी केळीच्या पिकांवर करपा व चरका या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे आता बागायतदार शेतकरीही संकटात सापडले आहेत़थंड वातावरणामुळे केळीच्या नवीन पिकांची वाढ खुंटली आहे. पाने पिवळी पडून करपत आहेत़ या समस्या सध्या केळी बागांमध्ये दिसून येत आहे. सध्या मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. केळीच्या पिकाला १६ ते ४० अंश सेल्सीअस तापमान मानवते; पण सध्या तापमान १० अंशांपेक्षा खाली आले आहे़ यामुळे बागांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे. परतीचा पाऊस न आल्याने बागांमध्ये करपा किंवा चरक्याचा फारसा प्रार्दुभाव जाणवला नव्हता; पण काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरला आहे़ तापमान कमी झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बऱ्याच ठिकाणी कोवळी पाने काळी पडून पिवळी पडत आहे. काही ठिकाणी जुनी पाने पिवळी पडून करपण्याचे प्रकार वाढले आहेत. थंडीचा जोर असाच कायम राहिल्यास गहू व हरभरा या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होईल तर केळी उत्पादक संकटात सापडणार असल्याचे दिसते़ मृग बागांमधील नवीन पाने निसवण्याचे प्रमाण कमी झाले असून नवीन निसवलेली पाने थंडीमुळे काळवडंलेली आहेत. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. आधीच अनेक संकटांचा सामना करणारा शेतकरी बेजार असताना त्यांच्या समस्यांत आणखी भर पडत असल्याचे दिसते़ येथील काही शेतकऱ्यांचे केळी हे मुख्य व नगदी पीक आहे. आता हे पिकही हातचे जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत़ कृषी विभागाने केळी बागांवर आलेल्या करपा व चरका या रोगांवर उपाययोजना सूचविणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)
थंडीमुळे केळी बागावर करपा
By admin | Published: December 29, 2014 11:50 PM