लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालय व सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय गाठून येथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी रुग्णालयाची गरज आणि संभाव्य रुग्णसंख्या याबाबत त्यांनी आढावा घेतला.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी सकाळी पहिले सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबतचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. गर्ग, रुग्णालयाचे अधिष्ठाता नितीन गंगणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कलंत्री, डॉ. सुबोध गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांची उपस्थिती होती. डॉ. सुबोध गुप्ता यांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण केले. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या खाटांचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला द्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
वर्धा जिल्ह्यात सध्या पुनश:च लॉकडाऊनची गरज नाहीच-डॉ. गुप्ताजिल्ह्याची परिस्थिती बघता सध्या वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. असे असले तरी नागरिकांनी मात्र गर्दी टाळायला हवी. तसेच गर्दीत एकत्र जेवण टाळावे. लग्नसमारंभात जेवणाचे कार्यक्रम टाळावे, असे सांगून जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करू नये. यामुळे नागरिक घाबरून पुन्हा चाचणी करण्याचे टाळतील. चाचण्यांची संख्या कमी झाल्यास कोविड बाधितांचा शोध घेणे कठीण होई, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
३०० रुग्णखाटांची व्यवस्था करू - डॉ. कलंत्रीरुग्णालयात २०० ऑक्सिजन तर २४ आयसीयू बेड व्हेंटिलेटरसहित आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मध्यतरी बेड संख्या कमी केली होती. मात्र, आता रुग्ण वाढल्यास ३०० बेडपर्यंतची व्यवस्था उपलब्ध करून देता येईल, असे डॉ. कलंत्री यांनी सांगितले.
आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील कंट्रोल रुमचे केले कौतुकसावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या पाहणी दरम्यान तेथील कंट्रोल रुमची पाहणी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली. कोविड बाधितांच्या नातेवाईकांना रुग्णांची सद्यस्थिती पाहता यावी यासाठी आय. सी. यु. आणि इतर वाॅर्डत लावलेल्या सी.सी.टी.व्ही.चे चित्रीकरण या कंट्रोल रुममधून बघता येते. या व्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. बोरले, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. श्रीवास्तव यांनी उपस्थिती होती.