आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १३२ कनिष्ठ महाविद्यालयातील १२ हजारांवर जागा रिक्त असल्याची अधिकृत आकडेवारी शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.मराठी शाळांमधील किलबिलाट झपाट्याने कमी होत असून पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तीच परिस्थिती सध्या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर आली आहे.जिल्ह्यामधील आठही तालुक्यात अनुदानित ८०, विना अनुदानित २१, कायम विना अनुदानित ०८ तर स्वयंअर्थसहाय्यित २३ अशी एकूण १३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयातील एका तुकडीला जास्तीत जास्त ८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परवानगी दिली जाते. त्यामुळे या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त (कला+वाणिज्य) या शाखेच्या २४ हजार १६० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या १८ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाला फक्त केवळ ६५.०५ लागल्याने ११ हजार ९३० विद्यार्थीच उत्तीर्ण झालेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल वाढल्याने कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या चांगलीच रोडावली, ही वस्तुस्थिती आहे.मंजूर जागांपेक्षा विद्यार्थी निम्मेआठही तालुक्यातील १३२ कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण २४ हजार १६० जागांना मान्यता देण्यात आली आहे. परंतु, दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ११ हजार ९३० इतकी आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक व कृषी अभ्यासक्रमांकडे धाव घेतली आहे. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका वर्गात किमान ४० विद्यार्थी असणे शासन नियमानुसार आवश्यक असल्याने हेही विद्यार्थी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांची शोध मोहीम सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येतो. परंतु, एकूण जागा आणि उपलब्ध विद्यार्थी संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाने किमान मर्यादेत सवलत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाविद्यालये पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 9:19 PM
दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देविद्यार्थीच मिळेना : १२ हजारांवर जागा रिक्त