वर्धा : पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी जिल्ह्यात १८ रोजी रात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. कोम्बिंग दरम्यान पोलिसांनी ५६ दारुविक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन ७ लाखांवर दारुसाठा जप्त केला इतकेच नव्हेतर दीडशेवर गुन्हेगार चेक केले.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोम्बिंग गस्त व नाकाबंदी मोहिम राबविण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश, तडीपार गुंड, माहितगार गुन्हेगार, बाहेर जिल्ह्यातुन आलेले तडीपार गुन्हेगार, सराईत गुन्हेगार, दारु विक्री करणाऱ्या अशा जवळपास दीडशे गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच दारुबंदी कायद्याखाली एकूण ५१ केसेस करुन ५६ दारुविक्रेत्यांवर गुन्हे दाखल करीत ७ लाख ७ हजार ६० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच एनडीपीएस कायद्यान्वये अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर जुगार कायद्यान्वये चार प्रकरण दाखल केली. मोहिमेदरम्यान हत्यार बाळगून फिरणाऱ्या सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
८० अधिकारी, ५१४ अंमलदारांचा समावेश
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास ८० पोलिस अधिकारी आणि ५१४ पोलिस अंमलदारांनी ही मोहिम राबविली. २९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन ठिकठिकाणी नाकेबंदी करुन सात पकड वॉरंट तामील करण्यात आले.
हॉटेल, लॉजसह धाब्यांची पाहणी
मोहिमेदरम्यान पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरालगतच्या तसेच ग्रामीण भागात असलेल्या हॉटेल व लॉजेसची तपासणी करुन धाब्यांचीही पाहणी केली. जवळपास १७ वर हॉटेल व लॉजेची पाहणी करुन लॉज व हॉटेल मालकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
५५६ वाहने चेक ३६५ चालकांवर कारवाई
मोहिमेदरम्यान लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एकूण ५५६ वाहनांची तपासणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर मोटर वाहन कायद्यान्वये ३६५ पेक्षा जास्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.