चर्चेअंती संप मागे: वर्धेत नियमानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल विक्री केंद्र असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे बाजार नियमनमुक्त केले. शिवाय अडत्यांना व्यापाऱ्यांनी सहा टक्के अडत द्यावी, असा फतवा काढला. शेतकरी हिताचा वाटत असलेल्या या निर्णयामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गुरूवारी वर्धेतील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न शेतकऱ्यांना भाजीपाला घेत शहरभर फिरावे लागले. यात काहींनी त्यांचा शेतमाल विकला तर सुमारे ९२ क्विंटलच्यावर शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागला. या प्रकरणी दुपारी बाजार समितीचे संचालक व अडत्यांमध्ये झालेली चर्चा अखेर निर्णयापर्यंत पोहोचली. यात अडत्यांनी व्यापाऱ्यांकडून कमिशन घेण्यास होणार दिला. तर व्यापाऱ्यांनीही त्याला मान्यता दिली. या कमिशनच्या वादातून शेतकरी मुक्त झाला असला तरी त्याला योग्य दर मिळणार अथवा त्याची पिळवणूक होणार हा मुद्दा कायम आहे. या चर्चेअंती अडत्यांनी त्यांचा संप मागे घेतला असून शुक्रवारपासून बाजारात नियमित लिलाव होणार असल्याचे व्यापारी व अडते गटाचे संचालक विजय बंडेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजतापासून शहरात भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला घेत शहरात भटकंती करावी लागली. वर्धेच्या बजाज चौकातील मुख्य भाजी बाजारातून सुमारे १२ ते १३ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आणला तसाच परत नेला. यामुळे सुमारे ९२ क्विंटलच्यावर भाजीपाला शहरातून परत गेला. १७ ते २० शेतकऱ्यांनी शेतमाल परत नेण्यापेक्षा शहरात विकणे पसंत केले. या शेतकऱ्यांनी शहरातील गोलबाजार, आर्वी नाका परिसरातील किरकोळ व्यापारी तसेच काही ठोक ग्राहकांना आपला भाजीपाला विकला. ठराविक दरामध्ये खरेदी नसल्याने गुरूवारी शहरात भाजीपाला बेभाव विकला गेल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत शहरात सुमारे १०० क्विंटल भाजीपाला शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांमार्फत विकला गेला. मोजक्या ठिकाणीच भाजी मिळत असल्याने ग्राहकांनाही त्रास झाला.(कार्यालय प्रतिनिधी) भाजीबाजारात केवळ अडत्यांची गर्दी व्यापारी शेतमाल खरेदी करणार नाही म्हटल्यावर मुख्य भाजी बाजारात लिलावच झाला नाही. परिणामी, बजाज चौकातील सर्व दुकाने गुरूवारी बंदच होती. केवळ अडतेच बाजारात दिसून येत होते. एक शेतकरी मात्र आपल्या शेतातील निंबू घेऊन त्यांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. प्रत्येक शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात असलेला माल असा विकू शकत नसल्याच्याच प्रतिक्रीया बाजारात उमटत होत्या.
९२ क्विंटलवर शेतमाल गेला परत
By admin | Published: July 15, 2016 2:22 AM