लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नुकताच दोन दिवसांपूर्वी फादर डे साजरा करण्यात आला. मुलांनी वडिलांचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यांच्याप्रति असलेली भावना व्यक्त केली. पण, दुसरीकडे साटोडा येथील मिसाळ ले-आऊटमध्ये वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढून त्यांचा छळ केल्याची घटना समोर आल्याने समाजमन सुन्न झाले. आजारी असलेल्या वृद्ध वडिलांनी थरथरत्या हाताने मुलाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलांवर चांगले संस्कार रूजविण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अहोरात्र आई-वडिल झटत असतात. पण, आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांचा सांभाळ न करता त्यांचा तिरस्कार करणारे मुलही या समाजात आहे. साटोडा येथील मिसाळ ले-आऊटमधील रहिवासी गणपत शेंद्रे आणि त्यांची पत्नी हे दोघेही आजारी असून त्यांना दर तीन दिवसांनी डायलीसीस करावे लागते. त्यांच्या घरातील वरच्या माळ्यावर त्यांचा मुलगा अनिल आणि सून प्रियंका शेंद्रे राहतात.वृद्ध गणपत शेंद्रे आणि त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. ही बाब मुलगा अनिल आणि सून प्रियंका यांना माहिती असताना देखील त्यांच्याकडून दोघांनाही मारहाण केली जाते. त्यांना घराबाहेर काढून दोन वेळचे जवेणही दिले जात नाही. तसेच घरातून बाहेर जा नाहीतर जीवाने ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याने अखेर त्रस्त झालेल्या वृद्ध वडिलांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून पोटच्या मुलाविरुद्ध तक्रार दिली.
रामनगर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक आणि पालकांचे पालण पोषण आणि कल्याण अधिनियम कायद्यान्वये मुलगा अनिल आणि सून प्रियंका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशा स्वरूपाचा वर्ध्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल असल्याने मुलांपासून होणाऱ्या त्रासामुळे वृद्ध आई-वडिलांना दिलासा मिळाला आहे.
सेवाग्राम ठाण्यात प्रकरण वर्गवृद्धाची तक्रार रामनगर ठाण्यात घेण्यात आली आहे. पण, साटोडा परिसर हा सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली आहे.