सीओंना निवेदन : वीज वितरणवर फौजदारी कार्यवाहीची मागणी हिंगणघाट : पालिका हद्दीतील वृक्षतोड करण्याची कुठलीही परवानगी न घेता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन वृक्षांची कत्तल केली. यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नगरसेविका कविता भाईमारे यांनी पोलिसांत केली. शिवाय या प्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील संत तुकडोजी वॉर्डात भाईमारे परिवाराने वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली; पण बुधवारी वीज वितरण कंपनीचे प्रमोद सहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन वृक्षाच्या मोठ-मोठ्या फांद्या निर्दयीपणे कापल्यात. याबाबत त्यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनात आले. पालिका हद्दीतील वृक्षतोड करण्यापूर्वी न.प. मुख्याधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. यामुळे नियमाचे उल्लंघन झाल्याने या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी हिंगणघाट यांना नगरसेविका भाईमारे यांनी करून संबंधितांवर कार्यवाहीची तक्रार पोलिसांत केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून योजना राबविल्या जात आहे. नागरिक व सामाजिक संस्थांचा या कार्यात मोठा सहभाग आहे. पालिकेच्या हद्दीत वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांकडून वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)
वृक्षतोडीविरूद्ध नगरसेविकेची पोलिसांत तक्रार
By admin | Published: July 15, 2016 2:31 AM