शहरात तणावाचे वातावरण : आश्वासनानंतर निवळले प्रकरणहिंगणघाट : येथीत मस्जिद मधून नमाज पडून मोटारसायकलने जात असताना येथील उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सुर्यवंशी यांनी अश्लील शिवीगाळ करीत बुधवारी मारहाण केल्याची तक्रार अब्दुल हमीद अ. गफ्फार यांनी हिंगणघाट पोलिसात केली. या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत सूर्यवंशी यांच्यावर कारवाईची मागणी जमावाने लावून धरली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी वर्धा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी जमावाला चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर रात्री वातावरण निवळले. प्राप्त माहितीनुसार, नमाज पडून रात्री ९ वाजताचे दरम्यान अब्दुल हमीद मोटार सायकलने उपविभागीय कार्यालयासमोरून नातेवाईकाकडे जात होते. त्यावेळी कार्यालयासमोर उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी उभे होते. त्यांनी अब्दुल हमीद यांची मोटारसायकल थांबवून त्यांना अश्लील शिवीगाळ देत मारहाण केली. त्यांनी कारवाई न करता मारहाण व शिवीगाळ केल्याने मानसिक संतुलन बिघडविले असून वरिष्ठांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईची मागणी अब्दुल हमीद यांनी पोलिसांत तक्रार देवून केली आहे. या प्रकरणी ठाणेदार बोडखे तपास करीत आहेत.
एसडीपीओ विरोधात तक्रार
By admin | Published: September 04, 2015 2:05 AM