वर्धा: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी केलेली वक्तव्ये ही बिनबुडाची असून, त्यामुळे शिंदे यांची बदनामी होत असल्याचे कारण सांगून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीसह शिवसेनेचे वर्धा जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे खासदार असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आजतागायत त्यांचेवर कुठलेही फौजदारी गुन्हे दाखल नाही. तरीपण संजय राऊत यांनी राजकीय पक्ष व लोकांमध्ये द्वेष्याची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केलेले आहे व समाजामध्ये बदनामी करण्याचा हेतू असल्याने संजय राऊत यांचे कृत्य भादवी कलम २११,१५३-अ,५००,५०१,५०४,५०५- २ प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल करण्यास पात्र आहे. तरी उपरोक्त कलमान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश इखार यांनी लेखी तक्रार द्वारे शहर पोलीस स्टेशनला केलेली आहे.