पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केळझर : राजरोसपणे दारूविक्री करणाऱ्या सुनेच्या कृत्याला कंटाळलेल्या सासूने सुनेची पोलीस अधीक्षक वर्धा यांचेकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली. केळझर येथील लीला राजेराम कोसारे, असे तक्रारकर्त्या सासुचे नाव असून रूपाली मारोती कोसारे असे गैरअर्जदार सुनेचे नाव आहे. तक्रारकर्त्या महिलेचा मुलगा व दारूविक्रेत्या गैरअर्जदाराचा पती गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून गैरअर्जदार महिला अवैध दारूचा व्यवसाय करीत असल्यामुळे घरातील तसेच मोहल्ल्यातील शांतता भंग होत आहे. तसेच समाजात गुन्हेगारीचेही प्रमाण वाढत असल्याचे तक्रारीत नमुद आहे. तसेच माझी सून रूपाली मारोती कोसारे ही माझ्या मोठ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यासोबतच त्याला बलात्काराच्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देते. मी शेतमजूर महिला असून रोजच्या या कलहामुळे घरातील शांतता भंग पावली आहे. दारूविक्रेत्या सुनेला दररोज पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनातून अवैधरित्या दारूसाठा पुरविल्या जातो व कर्करोगाने मरणासन्न अवस्थेत असलेल्या माझ्या मुलाला समोर करून माझी सून राजरोसपणे अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत आहे. असे तक्रारकर्त्या वृद्ध सासूने पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात सेलू पोलीस स्टेशनला अनेकदा निवेदन दिल्यानंतरही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केल्या जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. त्याचप्रमाणे गावात इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूविक्रीसह इतरही अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. परंतु पोलिसांचा यावर कुठलाही अंकुश नसल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे. नव्याने पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या पोलीस अधीक्षक निर्मला देवी यांनी उचित कार्यवाही करून दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या अनेक कुटुंबांचे संसार वाचवावे व माझ्या घरी सुरू असलेला अवैध दारूचा व्यवसाय सोबतच गावातील सुद्धा अवैध व्यवसाय बंद करावे, असे तक्रारकर्त्या लिला कोसारे यांनी निवेदनातून मागणी केली आहे.
त्रस्त सासूने केली दारूविक्रेत्या सुनेची तक्रार
By admin | Published: May 11, 2017 12:48 AM