लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शिवसेना पक्षाच्या नावावर कायम निलंबित करण्यात आलेले माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख प्रसार माध्यम व सोशल मीडियावर भ्रम पसरवून आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत उर्फ बाळू शहागडकर यांनी आर्वी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या तक्रारीत शहागडकर यांनी म्हटले आहे की, नीलेश देशमुख यांना शिवसेना पक्षातून कायम निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर पक्षाच्या चौकशीत मंत्र्यांच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकरण निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात यापूर्वी विविध प्रसार माध्यमांमध्ये माहितीही प्रसिद्ध झाली. त्यामुळे देशमुख यांना कायम शिवसेनेतून निलंबित करण्यात आले आहे. परंतु, देशमुख हे शिवसेना पक्षाच्या सोशल माध्यमांमध्ये तसेच वर्तमानपत्रांमध्येही बातम्या टाकून भ्रम पसरवित आहेत. देशमुख यांनी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात सोशल माध्यमांवर विविध पोस्ट टाकलेल्या आहेत. त्यावर प्रकाशक म्हणून त्यांनी स्वत:च्या नावाचाही उल्लेख केला आहे.त्यांना भाजप-शिवसेनेत कोणतेही अधिकार नाहीत. सोशल मीडियावर त्यांनी टाकलेल्या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे शहागडकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.आपली शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा अधिकार केवळ शिवसेना प्रमुखांना आहे. इतर कुणालाही असा निर्णय घेता येत नाही. हकालपट्टी, पदावरून काढण्याची प्रक्रिया केली गेल्यास तसे शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर केले जाते. आपण अजूनही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहोत. सैनिक म्हणून पक्षाचे काम करणार आहे.नीलेश देशमुख, आर्वी.
सेनेच्या जिल्हाप्रमुखांची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:30 PM