लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘विक एन्ड लॉकडाऊन’ लागू केला आहे. याच संचारबंदीच्या काळात म्हणजे रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. असे असले तरी १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांपैकी प्रथम सत्राच्या पेपरला ६५४, तर द्वितीयला ६६० परीक्षार्थी गैरहजर होते. तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेत त्याबाबतची माहिती आयोगाला पाठविली आहे.वर्धा शहरातील महादेवपुरा भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, सिव्हील लाईन भागातील गो. से. वाणिज्य महाविद्यालय, नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळा, सेवाग्राम मार्गावरील यशवंत महाविद्यालय, पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी हायस्कूल, तर सेवाग्राम मार्गावरील सुशील हिम्मतसिंगका विद्यालय या परीक्षा केंद्रांवर एकूण १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांना राज्य सेवा पूर्ण परीक्षा देण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत प्रथम सत्राचा पेपर पार पडला. १ हजार ९४४ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार २९० परीक्षार्थ्यांनी हा पेपर सोडविला, तर द्वितीय सत्राचा पेपर दुपारी तीन ते पाच या वेळेत याच सात केंद्रांवरून घेण्यात आला. यावेळी तब्बल ६६० परीक्षार्थी गैरहजर होते.
आरडीसींनी केली पाहणीरविवारी जिल्ह्यातील सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. ही परीक्षा सुरू असतानाच निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.
परीक्षा देणाऱ्यांत दोन कोविड बाधित व्यक्तींचा समावेशकोविड बाधित परीक्षार्थ्यांनाही राज्य सेवा पूर्ण परीक्षा देता येईल असे जाहीर करण्यात आले होते. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून रविवारी सुशील हिम्मतसिंगका या केंद्रावरून दोन कोविड बाधितांनी राज्य सेवा पूर्ण परीक्षा दिली. या कोविड बाधितांना परीक्षा देण्यासाठी केंद्रावर विशिष्ट आणि वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.
प्रत्येकाच्या शरीराचे तपासले तापमानपरीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान सुरुवातीला तपासण्यात आले. त्यानंतर सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत त्यांना बसवून परीक्षेचा पेपर देण्यात आला. एकूणच कोरोना संदर्भातील सर्वच खबरदारीच्या उपाय योजनांचे पालन सातही परीक्षा केंद्रांवर करण्यात आले.
पोलिसांचा होता चोख बंदोबस्तराज्य सेवा पूर्व परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातही परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक केंद्रावर पोलीस ठाण्यामधील दोन, तर पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी, तर सातही केंद्रांसाठी एक पोलीस अधिकाऱ्याने सेवा दिली.
रविवारी जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. दोन कोविड बाधितांनी रविवारी सुशील हिम्मतसिंगता या केंद्रावरून परीक्षा दिली. या काेविड बाधितांना बसण्यासाठी विशिष्ट आणि वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.