लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सदैव अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक नविन संकट उभे राहिले आहे. तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या गोगलगायींनी भाजीपाला, सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा तसेच इतर फळ पिकांसह अन्य झाडांवर आक्रमण केले असून पिकांची पाने खाऊन कोवळ्या अवस्थेतील पिके उद्ध्वस्त करीत आहेत. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कीटकनाशक फवारणीस ते जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील दोन तीन वषार्पासुन नदी, नाल्यांलगतच्या शेतात शंखीय गोगल गायी आढळत होत्या. तेव्हा त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचा फारसा उपद्रव जाणवत नव्हता. परंतु यावर्षी या गोगलगाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतासह त्यांच्या शेजारील शेतातही या गोगलगाईंनी आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात वळविला असून त्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. तर त्यांचा आकारही १५ ते २० सें.मी. पर्यत आहे.या शंखीय गोगलगाई रात्रीला शेतातील पिकांवर आक्रमण करतात तर दिवसा ढगाळी वातवरणात तूर, कपासी पिकांच्या शेंड्यावर, झाडांवर शेताच्या सभोवताल असलेल्या कुपाट्यावर दिसतात. तर उन्हं तापल्यास पिकांच्या व झाडांच्या बुडाशी मातीत लपून बसतात.
या शंखीय गोगल गाईंचा वेळीच नायनाट होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.