रोहित्राकरिता पिंपळगाववासी आक्रमक : पाच वर्षांपासून कंपनीचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : पिंपळगाव गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रात बिघाड असल्याने नवीन रोहित्र बसविण्याच्या मागणीकडे तब्बल पाच वर्षांपासून विद्युत महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याची धक्कादायकबाब पुढे आली. यामुळे संतापलेले नागरिकांनी गिरड विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात आले. येथे अभियंता नसल्याने त्यांच्या खुर्चिला चिपकवित गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. गिरड येथील अभियंता वारंवार गैरहजर राहत असल्याने या भागातील विविध समस्या साधारण कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सोडविल्या जात आहे. अधिकारी बेपत्ता असल्याने कर्मचारीदेखील वेळकाढूपनाने काम करीत आहे. यामुळे नागरिक हैराण होत आहे. पिंपळगाव येथील मन्नुलाल ग्वालबंस यांच्या शेतातील रोहित्रावरून गावाला विद्युत पुरवठा होतो. मात्र गत पाच वर्षांपासून येथील रोहित्र दुरस्त केले नसल्याने वेळभ अवेळी येथे तांत्रिक अडचण येते. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या रोहित्रावरून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने घरगुती वापराची टीव्ही, कुलर, मोटार आदी इलेक्ट्रानिक वस्तू जाळून खाक होत आहे. या प्रकरणात वारंवार अभियंत्याकडे दुरुस्तीची मागणी करून देखील दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी या संदर्भात १५ जून २०१२ रोजी निवेदन विद्युत पुरवठा कंपनीकडे केले होते. या निवेदनाची दाखल न घेतल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव मंजूर करून संबधित विभागाकडे पाठविण्यात आला. त्याचाही विशेष परिणाम झाला नाही. यानंतर २५ जानेवारी २०१५ च्या ग्रामसभेत ठराव घेवून रोहित्र तातडीने बसविण्यासंदर्भात मागणी केली. ३० एप्रिल २०१५ , १९ आक्टोंबर २०१५ अश्या तीन वेळा पाठपुरावा करीत तक्रारी संबधित विभागाकडे सादर केल्या. याशिवाय ५ फेब्रुवारी २०१६, १४ मार्च २०१६ आणि ११ जुलाई २०१६ रोजी निवेदने दिली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. यामुळे १ मे २०१७ रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून विभागीय कार्यालयात पाठविण्यात आला. याचाही काही उपयोग झाल झाला नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चक्क अभियंत्याच्या खुचीर्ला निवेदन चीपकावून रोष व्यक्त केला. यावेळी पिंपळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच यादव राऊत, रामकृष्ण धोटे, स्वप्नील चाफले, स्वप्नील वैद्य, गणेश कुटे, घनश्याम कराळे, प्रकाश गेडाम, संदीप चीताळे, रमेश राऊत, देविदास घोटेकर आदींची उपस्थिती होती.
संतप्त गावकऱ्यांनी अभियंत्याच्या खुर्चीला चिपकवले निवेदन
By admin | Published: June 24, 2017 12:56 AM