लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नाचणगाव ही देवळी येथील लोकसंख्येच्या तुलनेत बरोबरीची आहे. देवळीचा विकास पाहता नाचणगाव विकासाबाबत उपेक्षितच राहिले. मागील पाच दशकापासून या ग्रामपंचायतवर कॉँग्रेसची सत्ता आहे. परंतु, तत्कालीन राज्यकर्त्यांनी या गावाचा विकास न करता स्वत:चाच विकास केला. ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार, नियमबाह्य कामांकडे या मंडळींनी सातत्याने दुर्लक्ष केले. या क्षेत्रातील विकासकामांना बगल देत कॉँग्रेसच्या नेते मंडळींनी गांधी घराण्याचे नाव पुढे करून घराणेशाहीची दुकाने चालविली, असा घणाघाती आरोप खासदार रामदास तडस यांनी केला.नाचणगाव येथील विठ्ठल रुख्माई मंदिराच्या सभागृहात विविध विकासकामांचे भूमिपूजन, हायमास्टचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, जि.प. सदस्य जयंत कांबळे, पं.स. उपसभापती प्रवीण सावरकर, किशोर गव्हाळकर, राहुल चोपडा, भाजपचे ओंकार राऊत, सुरेश हनमंते, दीपक फुलकरी प्रामुख्याने उपस्थित होते.मेळाव्याचे प्रास्ताविक जि.प. सदस्य सावरकर केले. कार्याची माहिती पं.स. उपसभापती गव्हाळकर यांनी दिली. संचालन व आभार प्रदर्शन विनोद माहुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संतोष तिवारी, रमेश निंबाळकर, मंगेश रावेकर, अरविंदा नागतोडे, नीलिमा गावंडे, सचिन कासार आदींनी सहकार्य केले. यावेळी रस्त्यांचे भूमिपूजन, हायमास्ट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.
कॉँग्रेसने गांधींच्या नावाने घराणेशाही चालविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:05 AM
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नाचणगाव ही देवळी येथील लोकसंख्येच्या तुलनेत बरोबरीची आहे. देवळीचा विकास पाहता नाचणगाव विकासाबाबत उपेक्षितच राहिले. मागील पाच दशकापासून या ग्रामपंचायतवर कॉँग्रेसची सत्ता आहे.
ठळक मुद्देरामदास तडस यांची घणाघाती टीका : नाचणगाव येथे कार्यकर्ता मेळावा