काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:00:11+5:30

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे.

Congress front formation; The trumpet of organizational elections | काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा वाजला बिगुल

काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा वाजला बिगुल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कधीकाळी गड असलेल्या जिल्ह्यात गटबाजीमुळे काँग्रेस खिळखिळी झाली. हीच परिस्थिती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्याने आता काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यापासून तर बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहे. याची सुरुवात सध्या बूथस्तरावरून सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी बदलेले दिसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा पूर्वीची ताकद मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याकरिता शुक्रवारी स्थानिक सद्भावना भवनात काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा प्रभारी जिया पटेल व जिल्हा निवडणूक अधिकारी संजिता सिहाग (राजस्थान) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा, ब्लॉक व बूथ स्तरीय संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. 
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे. शनिवारपासून बूथस्तरावरून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्यात ती जिल्हास्तरावर पोहोचणार असून काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बुथ, ब्लॉक व जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

नोंदणीत मागे, पण पदासाठी पुढे
-   काँग्रेसमधील दोन गटांतील वाद काही थांबत नसल्याने डिजिटल सदस्य नोंदणीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एकाने गटाने पक्षादेश पाळत काम करायचे आणि दुसऱ्या गटाने त्याला हातभार नाही तर सुरुंग लावायचे, असाच प्रकार सुरू आहे. सद्भावना भवनातील बैठकीदरम्यानही ही गटबाजी दिसून आली. नोंदणीत मागे आणि पद मिळविण्याकरिता पुढे का? असा प्रश्न उपस्थितांना पडला.

अशी होणार जिल्हाध्यक्षाची निवड
-   जिल्ह्यातील देवळी-पूलगाव, हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी, वर्धा-सेलू व आर्वी-आष्टी-कारंजा या चार विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १२ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहे. या ब्लॉकमधील प्रत्येक बूथवरून बूथ अध्यक्ष आणि डेलिगेटस् अशा दोघांची निवड केली जाणार आहे. सर्व बूथवरील अध्यक्ष व डेलिगेटस् हे एका ब्लॉकमध्ये सहा सदस्यांची निवड करतील. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष अशी पदे राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक ब्लॉकमधील सहा पदाधिकारी म्हणजे ७२ जणांमधून जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते, हे येणारा काळच सांगेल.

पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यात डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. आता या सदस्यांमधून बूथ, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याकरिता निवडणूक होणार असून, या सदस्यांनाच उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. जिल्ह्यातील १२ ब्लॉकमधून प्रत्येकी सहा पदाधिकारी निवडल्यानंतर, त्या ७२ पदाधिकाऱ्यांतून जिल्हाध्यक्षाची निवड होईल.
- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, वर्धा.

जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव मिळाले आहे. या जिल्ह्यात काँग्रेसच एक वेगळ महत्त्व असल्याने येथे काँग्रेसच वाढायला पाहिजे. परंतु, काँग्रेसमधील आपसी गटबाजी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. आता नव्याने सर्वांना एकत्र आणून काँग्रेसला उभारी देण्याची गरज आहे. त्याकरिता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येवून संघटनात्मक बांधणी करावी.
- संजिता सिहाग,  जिल्हा निवडणूक अधिकारी.

 

Web Title: Congress front formation; The trumpet of organizational elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.