काँग्रेस गटनेत्याने ‘रायगड’मध्ये बळकावले दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:00 AM2021-06-28T05:00:00+5:302021-06-28T05:00:14+5:30
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या कित्येक वर्षापासून जलकुंभाखाली असलेले नगरपालिकेचे कामकाज गुपचूप सुसज्ज अशा ‘रायगड’ इमारतीमध्ये गेले. या ठिकाणी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह अधिकाऱ्यांकरीता वेगळे दालन तयार करण्यात आले. तसेच तीन गटनेत्यांकरिता एका मोठ्या हॉलमध्ये वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली. परंतु पालिकेत संख्याबळ नसतानाही काँग्रेसच्या गटनेत्याने चक्क एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेले दालन बळकावले. स्वतंत्र्य दालन मिळविण्याची ही हाव इतर नगरसेवकांना खटकल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेसचे पाच असे संख्याबळ आहेत. पालिकेत विरोधी पक्षनेत्याकरिता १३ नगरसेवकाचे संख्याबळ आवश्यक आहे. परंतु हे संख्याबळ कोणत्याही विरोधी पक्षाकडे नाहीत. त्यामुळे भाजपाचे गटनेता म्हणून प्रदीप ठाकरे, राष्ट्रवादीचे सोनल ठाकरे आणि काँग्रेसचे नीलेश खोंड यांची सदस्यांनी निवड केली आहे. ‘रायगड’ मध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेता नसल्याने त्यांचे वेगळे दालन न करता तीन गटनेत्यांसाठी एकाच मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली. याच हॉलच्या बाजुला एका अधिकाऱ्यासाठी दालन राखीव ठेवले होते. पण, स्वतंत्र्य दालनाचा मोह आवरला नसल्याने अल्पसंख्याबळ असतानाही काँग्रसचे गटनेता नीलेश खोंड यांनी अधिकाऱ्याच्या राखीव दालनावर अतिक्रमण करुन ते दालन ताब्यात घेतले. याप्रकारामुळे सत्ताधारी आणि दुसऱ्या नंबरचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. काँग्रेसच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन मिळते तर आम्हाला का नाही; अशीही चर्चा आता पालिकेत सुरु झाल्याने दालनावरुन वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी गप्पच
न.प. मध्ये भाजपाकडे संख्याबळ आहे आणि सत्ताही. तरीही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गटनेत्याकरिता एका हॉलमध्ये बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पण, काँग्रेसच्या गटनेत्याने कोणाचीही परवानगी न घेता स्वत: एका अधिकाऱ्यासाठी राखीव असलेल्य दालनात घुसखोरी करुन आपल्या नावाची पाटी लावत कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. केवळ पाच नगरसेवकांच्या जोरावर गटनेता झालेला नगरसेवक स्वतंत्र दालन घेऊन शकतो तर मग सत्ता असलेल्या भाजपाच्या आणि त्यांनतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीच्या गटनेत्याला स्वतंत्र दालन का नाही? असा प्रश्न आता चर्चीला जात आहे. पण, याबाबत नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारीही गप्प असल्याने नगरसेवकांचाही रोष वाढत आहे. आता नगरसेवक काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
येत्या काही दिवसावर पालिकेच्या निवडणुका आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी स्वतंत्र दालन आवश्यक होते. तिन्ही पक्षाचे गटनेते एकाच ठिकाणी चर्चा कशी करणार? त्यामुळे सुुरुवातीपासून स्वतंत्र दालन मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आता मी माझे स्वतंत्र दालन मिळविले. इतर गटनेत्यांनीही त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन घ्यावे.
- नीलेश खोंड, गटनेता, काँग्रेस, न.प.वर्धा.