लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बापू कुटीत उपस्थित राहून अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह शेकडो काँग्रेस नेत्यांनी प्रार्थना सभेतून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.सेवाग्राम आश्रमात सकाळी ११.४८ वाजता राहुल गांधी यांचे आमगन झाले. डॉ. मनमोहन सिंग यांचा सूतमाळ, चरखा, खादीची शाल, पुस्तक व आश्रमची माहिती पुस्तिका देऊन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी सत्कार केला. तर सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे स्वागत शोभा कवाडकर, अशोक शरण यांनी केले. त्यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनी लावलेल्या वृक्षाला राहुल गांधी यांनी पाणी घातले. आदी निवासमध्ये आगमन होताच मार्गदर्शिका संगीता चव्हाण व प्रभा शहाणे यांनी मान्यवरांचे सूतमाळेने स्वागत केले. अधीक्षक भावेश चव्हाण यांनी यावेळी सर्व माहिती दिली. बापू कुटीला भेट देत सूतकताई करीत असलेल्या गांधीवाद्यांशी मान्यवरांनी संवाद साधला. त्यानंतर राहुल गांधी यांनी लावलेल्या बकुळीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर त्यांचे बापू कुटी समोरील प्रांगणात आगमन झाले. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांनी सर्वधर्म समभाव प्रार्थना व ‘वैष्णव जन हे सारे कहायो’ हे भजन सादर करण्यात केले. मी स्वत:हून आज येथे आलो. गांधीजींच्या भूमीत मला भजन म्हणण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो, असे यावेळी ते म्हणाले. त्यानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी लावलेल्या बेलाच्या झाडा शेजारी स्वत: राहुल गांधी यांच्या हस्ते बेलाचे झाड लावण्यात आले. खा. राहुल गांधी प्रार्थनेसाठी इतर मान्यवरांसोबत रांगेत खाली बसले. सोनीया गांधी व डॉ. मनमोहन सिंग यांना बसण्यासाठी आश्रम पंरपरेप्रमाणे पाटांची व्यवस्था करण्यात आली होती. आश्रम अभिप्राय नोंदवहीत या वेळी त्यांनी कोणताही अभिप्राय लिहिला नाही.
महात्म्यासमोर काँग्रेस नेते झाले नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:35 AM