वर्धा - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने एक दिवसांची तर केंद्रात ५२ वर्ष सत्ता भोगली. परंतु, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रभावी कामच केले नसल्याने त्यांना सध्या सारे प्रश्न सोडविल्याचा दावाच करता येत नाही. नाचता येईना अंगण वाकडे अशी गत सध्या सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी वर्ध्यामध्ये केली.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, धुल थी चेहरेपे पर आईना साफ करते रहे. इतकेच नव्हे तर निवडणूक जिंकता येईना; पण ईव्हीएमला दोष देत राहिले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ४७ वर्ष दोन महिने १ दिवस सत्ता भोगली. तर ५२ वर्ष केंद्राची सत्ता भोगली. मात्र, निवडणुकांमध्ये पराजय होताच ईव्हीएमला दोष दिल्या जात आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त सत्ता भोगणाऱ्यांना आपण सर्व प्रश्न सोडविले असा दावाच सध्या करता येत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुनगंटीवार हे खरीप हंगाम आढावा बैठकीच्या निमित्ताने वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी ही टिका केली आहे.