लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापुकटीतील दर्शनानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमतीची बैठक होईल. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी तीन कि.मी.ची पदयात्रा करून जाहीर सभा घेतील. महात्माजींच्या भूमितून राहुल गांधी हे भाजप व संघ परिवारावर हल्लाबोल करीत आगामी निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत.राहुल गांधी यांची वर्धा येथील ही सभा विदर्भासह राज्यातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. यासाठी कार्यकर्तेही सज्ज झाले आहे. या ऐतिहासीक सभेच्या यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विशेष लक्ष घालून आहेत.राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता सेवाग्राम आश्रमात पोहचून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करतील. त्यानंतर सेवाग्राम येथेच महादेवभाई देसाई भवनात कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक होणार आहे. तीत राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह कॉँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील किमान दीडशे नेते उपस्थित राहतील. यासाठी बापुकुटीसह संपूर्ण सेवाग्राम परिसर सुरक्षेसह सज्ज झाला आहे. एसपीजी पथकाने संपूर्ण आश्रमची गेल्या तीन दिवसांपासून तपासणी सुरू केली आहे. वर्धा शहरातही सभास्थळ व पद यात्रेच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. १००० वर अधिक पोलीस याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचे जवान या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.राहुल गांधी यांचे बापुकुटी येथे आगमन झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सुतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गांधीजींच्या वास्तव्य राहिलेल्या कुटीला भेट देतील. व तेथे गांधीजींना अभिवादन करतील. त्यानंतर आश्रम परिसरात राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाईल. तसेच आश्रमच्याच रसोड्यामध्ये राहुल गांधी निवडक नेत्यांसह भोजन घेतील. या जेवनाचा मेनू आश्रमने निश्चित केला असून ते तेथे आश्रमच्या सहकाऱ्यासह चर्चा करतील. जवळजवळ ४५ मिनिट राहुल गांधी येथे थांबण्याची शक्यता असून त्यानंतर ते महादेवभाई देसाई भवनाकडे मार्गस्थ होतील. या महादेवभाई देसाई भवनात काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीला १२.३० वाजता सुरूवात होईल. या भवनात होणारी ही काँग्रेसची दुसरी बैठक असेल. बैठक किमान सव्वा दोन तास चालेल. त्यानंतर राहुल गांधी येथून वाहनाने वर्धा शहरातील यशवंत महाविद्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचतील. दुपारी २.४५ वाजता येथे राष्ट्रपित्याच्या पुतळ्याला हार्रापण करून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरूवात होणार आहे. जवळजवळ तीन कि़मी. राहुल गांधी या पदयात्रेत पायी चालतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यात विशेषत: वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी व बाहेरून आलेले ठराविक पदाधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रामनगर येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर राहुल गांधी पोहचतील व तेथे ३.४५ वाजता जाहीर सभेला सुरूवात होईल. सर्कस ग्राऊंड मैदान सभेसाठी सज्ज करण्यात आले आहे. सर्कस ग्राऊंड मैदानाकडे पोहचणाऱ्या सर्व मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. वर्धा शहरातील गांधी जयंतीच्या कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेऊन काही मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.कार्य समितीत होणार तीन ठरावकाँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत राजकीय आर्थिक आणि गांधी विचारावरील तीन ठराव पारित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोणातून मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलण्याच्यादृष्टीने या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे.
गाधींच्या भूमितून काँग्रेस करणार शंखनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 7:42 PM
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापुकटीतील दर्शनानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमतीची बैठक होईल. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी तीन कि.मी.ची पदयात्रा करून जाहीर सभा घेतील. महात्माजींच्या भूमितून राहुल गांधी हे भाजप व संघ परिवारावर हल्लाबोल करीत आगामी निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत.
ठळक मुद्देराहुल गांधी ‘सेवाग्राम’मध्ये करणार अभिवादन : पदयात्रेतून जिंकणार, सभाही ऐतिहासिक होणार