काँग्रेस छेडणार आणखी एक स्वातंत्र्यता संग्राम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:33 PM2018-10-02T23:33:54+5:302018-10-02T23:47:11+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ठपका ठेवत या विरोधात आणखी एक नवा स्वातंत्र्यता संग्राम छेडण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. यासाठी काँग्रेस महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालणार असून सोबतीला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याचाही आधार घेणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम (वर्धा ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीविरोधात दिलेल्या ‘चलो जाव’च्या नाऱ्याचा धागा धरत आता काँग्रेस केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार घालविण्यासाठी सज्ज झाली आहे. मोदी सरकार देशात घृणा पसरविण्याचे, फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा ठपका ठेवत या विरोधात आणखी एक नवा स्वातंत्र्यता संग्राम छेडण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. यासाठी काँग्रेस महात्मा गांधी यांच्या मार्गावर चालणार असून सोबतीला माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याचाही आधार घेणार आहे.
सेवाग्राम येथील सर्व सेवा संघाच्या महादेव भाई भवनात मंगळवारी अ.भा. काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह कार्यसमितीतील सुमारे ५३ नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रारंभी काँग्रेस नेते के.के. धवन व गुरुदास कामत यांना शोक प्रस्ताव घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दोन महत्वपूर्ण ठराव पारीत करीत २०१९ च्या निवडणुकीच्या रणणितीवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांना आत्मसात करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पारित झालेल्या प्रस्तावांची माहिती दिली. भाजपा व संघ परिवाराने गांधी विचारधारेचा विरोध केला. आता सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी हे लोक सोंग घेऊन गांधींपुढे हात जोडत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. मोदी सरकार देशात भीतीचे वातावरण निर्माण करून ध्रुवीकवरण करीत आहे. लोकांचा आवाज दाबण्याचे त्यांचे विचार आहेत. यांना देशात अराजकता माजवायची आहे. फक्त द्वेशाचे राजकारण केले जात आहे. या सर्व चक्रातून देशाला मु्क्त करण्यासाठी काळाजी गरज विचारात घेता एक नवा स्वातंत्र्य संग्राम सुरू केला जाईल व यात पूर्णपणे यश मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार करणारा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत दुसरा प्रस्ताव पारित करीत शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारकडून शेतकºयांची होत असलेली फसवणूक व त्यांच्यावर होणाऱ्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. डिझेल व खतांचे वाढते भाव, जीएसटी यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतमालाला भाव मागण्यासाठी, मोदींना त्यांनी दिलेल्या दीडपट हमीभावाच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांवर सरकारने लाठ्या चालविल्या, अश्रू धुराच्या नळकांड्या फेकल्या. शेतकºयांवरील हा अत्याचार काँग्रेसला मान्य नाही. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस नेहमी कटिबद्ध असेल, असा ठराव घेत काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
भाजपा गोडसे विचाराची समर्थक
भाजपातर्फे गांधी जयंती साजरी करण्यात येत असल्यावर टीका करीत सुरजेवाला म्हणाले, सत्य व सद्भावनेची गांधी विचारधारा जीवनात आत्मसात करणे कठीण आहे. राजकीय फायद्यासाठी गांधींच्या चष्म्याचा भाजपाने वापर केला. सत्तालालसेपोटी गांधींच्या नावाचा वापर करणारे हे लोक गांधींचे विचार मात्र कधीच आत्मसात करू शकत नाहीत. कारण ते गांधींची हत्या करणाऱ्या नाथुराम गोडसेच्या विचारांचे समर्थक आहेत.
राहुलसंग सेल्फी,सोनियाने हात मिळविला
कार्यसमितीच्या बैठकीनंतर राहुल व सोनिया गांधी या महादेव बवनातून बाहेर पडल्या. गाडीत बसत असताना तेथे उपस्थित महिला व विद्यार्थीनींना पाहून राहुल व सोनिया गांधी हे सुरक्षा घेरा तोडत त्यांच्याकडे चालत गेले. दोन्ही नेत्यांनी महिलांशी हस्तांदोलन केले. राहुल यांनी तर चक्क मराठीत ’तु्म्ही कसे आहात’ अशी विचारणा केली. कस्तूरबा रुग्णालयातील कर्मचारी रोशनी मेंढे यांनी राहुल यांच्यासोबत सेल्फी काढून घेतली. छाया बलबीर, उज्जवला, मनीषा आदी राहुल यांचा साधेपणा पाहून भारावून गेल्या. याच वेळी तेथे आईसोबत असलेल्या एका चिमुकल्याला राहुल गांधी यांनी कडेवर घेतले, तर गाडीत बसताना एका चिमुकलीलाही मांडीवर बसविले. त्या कुटुंबानेही राहुल गांधींसोबत फोटे काढून घेतला.