वर्धा : कारंजा येथील नगर पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदावर काँग्रेसच्या स्वाती गजानन भिलकर, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे भगवान बुवाडे हे विजयी झाले. एकूणच कारंजा नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची माळ काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या स्वाती भिलकर, तर भाजपच्या योगीता कदम यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भगवान बुवाडे आणि भाजपचे हेमराज भांगे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. काँग्रेसच्या स्वाती भिलकर याना नऊ, तर योगीता कदम यांना आठ मते पडली. त्यामुळे स्वाती भिलकर यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच उपध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे भगवान बुवाडे यांना नऊ, तर भाजपच्या हेमराज भांगे याना आठ मते पडल्याने काँग्रेसचे भगवान बुवाडे यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी हरीष धार्मिक, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी किशोर साळवे यांनी काम पाहिले. निवड प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त होता.
शहरात काढण्यात आली विजयी मिरवणूक
कारंजा नगर पंचायतीवर पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान करण्यात काँग्रेसला यश आले आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. शिवाय, शहरातील प्रमुख मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.