भाजप नगरसेवकांकडून निषेध : निविदा प्रक्रिया करण्यास टाळाटाळ अमोल सोटे आष्टी (श.) स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीदभूमी आष्टीच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटींचा निधी दिला. यातून ३ कोटी गावातील विकास कामे तर २ कोटी स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळावर खर्च होणार ओह. यातील ३ कोटींच्या कामाची ई-निविदा होऊन भूमिपूजन सत्ताधारी काँग्रेसच्या आमदार व नगराध्यक्षांनी केल्याने श्रेयवादाला तोंड फुटले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ९ कामांना कार्यारंभ मिळाला. भूमिपूजनानंतर तब्बल तीन महिने कामे ठप्प पडली आहे. पालकमंत्री येण्यापूर्वीच नगरपंचायतने भूमिपूजन केले. यावर भाजपाचे नेते दादाराव केचे व नगरसेवक काहीच बोलले नाही. केचे यांच्या प्रयत्नांमुळे पालकमंत्र्यांनी निधी दिला, हे वास्तव तालुक्याला माहिती आहे. कालपर्यंत सर्व ‘आॅल वेल’ होते; पण १५ दिवसांपासून काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जाहीर पोस्टरबाजी सुरू केली. यात निधी आणून कामे केल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यांची गंभीर दखल भाजप नगरसेवकांनी घेतली. त्यांनी नगर पंचायत सभेत आवाज उठविला. तीन कोटींचे भूमिपूजन तुम्ही केले; पण निधी पालकमंत्र्यांनी दिला. याचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे भाजप गटनेते अशोक विजयकर यांनी काँग्रेस नगरसेवकांना सुनावले. सोबतच नगर पंचायतच्या बोगस तथा जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवणाऱ्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली. यात न.पं. च्या हक्काचा १४ व्या वित्त आयोगाचा १ कोटी ८८ लाख रुपये निधी एक वर्षापासून तसाच पडून का आहे, वर्षभरात एखादा रपटा वा नाली केली काय, रस्ता अनुदानाचे २० लाख रुपये येऊन ६ महिने झाले. यातून रस्ता कामे का केली नाही. नागरी दलित वस्तीच्या विकासाकरिता एक वर्षापासून आलेल्या २१ लाख रुपये निधीची कामे सुरू करण्यास काँग्रेस नगरसेवकांचा अट्टहास आहे. क वर्ग यात्रा स्थळातील कपिलेश्वर देवस्थान टिपरीवाले बाबा देवस्थान, पीरबाबा टेकडी देवस्थानची बंद पडलेली कामे सुरू करण्यासाठी कुठलाही पाठपुरावा केला नाही. नगरपंचायतला जोडलेल्या मौजातील बंद पडलेल्या पांदण दुरूस्तीच्या कामासाठी सत्तारूढ काँग्रेसने काय पाठपुरावा केला. गरीबांच्या निवाऱ्यासाठी असलेल्या घरकूल योजनेची सुरूवात केली नाही. शेतकरी, महिला, अपंग, दलित, आदिवासी व मुस्लीम अल्पसंख्याकांकरिता असलेल्या शासकीय योजनांसाठी वर्षभरात काहीही प्रयत्न केले नाही. काँग्रेसच्या स्वनाम-धन्य नेत्यांनी आधी जनतेला उत्तरे द्यावी, असे आव्हान भाजप नगरसेवकांनी केले आहे.
पाच कोटींसाठी काँग्रेसकडून ‘श्रेय’वाद
By admin | Published: January 15, 2017 12:42 AM