लाेकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी देशभरात सत्याग्रह केला जाणार आहे. सेवाग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आश्रमासमोरही राज्यव्यापी सत्याग्रह केला जाणार असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील मंत्री महोदय उपस्थित राहणार आहे.
सेवाग्राम येथील आश्रमासमोर दिवसभर हा सत्याग्रह चालणार असून यात महाराष्ट्राचे प्रभारी एस. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुनील केदार व आमदार रणजित कांबळे यांच्यासह स्थानिक नेते मंडळी व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहे. शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत आयोजित सत्याग्रहाची सुरुवात आश्रम परिसरात सर्व धर्म प्रार्थना आणि आश्रमात नेत्यांनी लावलेल्या वृक्षांना पाणी घालून केली जाणार आहे. या सत्याग्रहाच्या आयोजनाची व्यवस्था करण्यासाठी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सेवाग्रामात दाखल झाले आहे.