लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : हाता-पायांना मुंग्या येणे, हे अगदी सामान्य लक्षण मानले जाते. सतत एका अंगावर झोपल्याने किंवा हात अंगाखाली आल्याने देखील हात-पायांना मुंग्या येतात आणि काही वेळाने त्या कमी होतात. म्हणून अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते; परंतु हाता-पायांना मुंग्या येण्याची इतर अनेक कारणे आहेत. यामध्ये 'व्हिटॅमिन ई', 'व्हिटॅमिन बी'ची कमी, मधुमेह यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने सतत हाता-पायांना मुंग्या येतात. वाढलेल्या कोलेस्ट्रॉमुळे धोका असतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने या आजारांचा धोका
- कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्त नसांमध्ये जमा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलला वैद्यकीय भाषेत सायलेंट किलरदेखील म्हटले जाते.
- आजच्या घडीला कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक आजाराचा धोका वाढलेला आहे. वयाची ३५ ते ४० वर्षे ओलांडल्यानंतर आपल्या आरोग्याची तपासणी करणेही गरजेचे आहे. अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास काय खाऊ नये तळलेले व भाजलेले पदार्थ, जास्त प्रमाणात तूर, मलाईचे पदार्थ, लाल मांस, मिठाई व गोड पेय, जास्त मीठ, फायबरयुक्त पदार्थ, फॅट असलेले पदार्थ व प्रोटिनयुक्त पदार्थ आदी पदार्थ खाऊ नये, असे डॉक्टरांचे सांगणे आहे.
कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे काय? शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हात-पाय सुन्न पडतात. डोळ्याजवळ गाठ निर्माण होते; तसेच जिभेचा रंगही बदलतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरातील मेणासारखा असणारा हा पदार्थ शरीरातील रक्त गोठवतो. कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा सायलेंट किलर अटॅकचा धोका उदभवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच उपचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हाता-पायांना नेहमी मुंग्या येणे हे स्वाभाविक असले तरी त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेवुन उपचार करणे आवश्यक आहे.
"आजार होण्यापूर्वी काही लक्षणे जावतात. ते आपल्या ओळखता आले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलमुळे सायलेंट किलर अटॅकचा धोका असतो."- डॉ. अंकुश कावलकर, जनरल फिजिशियन, वर्धा.