सेवाग्राम : स्वातंत्र्यासाठी किती संघर्ष व त्याग करावा लागला हे त्या पिढींना माहिती आहे. लोकतंत्र चालविण्यासाठी अनुशासन पाहिजे. यासाठी संविधान आणि काही संस्था देशात कार्यरत आहेत; पण या संस्था आता विरोधकांना चाबूकचे काम करीत असल्याचे दिसून येते. देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.
दत्तपूर येथील मनोहर धाम येथे राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने सात दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अमरनाथ भाई तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा व राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अजमत भाई उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनी लाेकांना प्रेरणा दिली. अनुशासनाशिवाय देश तर काय कुठलंही काम होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाला चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. गुजरातमध्ये दंगल झाली; पण कुणाला शिक्षा झाली; उलट सत्कार करण्यात आला. विरोधात बोलले तर सभासदत्व रद्द करतात. या देशात लोकतंत्र मृत झाल्यासारखे वाटते. मनोहर दिवान यांनी कुष्ठरोगींसाठी संस्था काढली; पण त्यांना पैसेही मिळत नाही, असे सांगताना त्यांनी जंतरमंतरवर देशाचे अन्यायग्रस्त खेळाडू गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत, त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन युवकांना केले. गेल्या २७ वर्षांपासून याच तारखेला आणि महिन्यात राष्ट्रीय शिबिर घेतले जाते. हे २८ वे शिबिर दत्तपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड व ओडिसा या राज्यातील १८० युवा शिबिरार्थी यात सहभागी झाले आहेत. जैसलमेर राजस्थान येथील तरुण गेवा व ॲड. रझिया मेहर या तरुणी शिबिरात सहभागी असून अशा वैचारिक आणि प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रेरणा देसाई यांनी करून दिला. प्रास्ताविक राष्ट्रीय संयोजक अजमतभाई यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत नागोसे यांनी केले.
परिस्थिती बदलत आहे, हार मानू नका : आशा बोथरा
देश, प्रेम निवडणुकीसाठी नाही. देशासाठी हृदयातून प्रेम पाहिजे. परिस्थिती बदलत आहे त्यामुळे हार मानू नका. आपण सर्व संविधानाला मानतो. तुमच्या मतांचे मूल्य समजून घ्या. या देशासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान आहे. संघर्षाची गरज आहे. आता देशाला वाचविण्याची गरज असल्याने सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आशा बोथरा यांनी केले.
लोकतंत्राच्या दिशेने वाटचाल करा : अमरनाथ भाई
सत्तेतील लोकांना संविधानाशी देणे-घेणे नाही. गांधीजींची हत्या करण्यात आली; पण गांधी विचार आजही कायम आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याची यांना आता संधी मिळाली आहे. मी इमर्जन्सी पाहिली; पण तानाशाहीशी तुलना होऊ शकत नाही. अशा शिबिर, संमेलनाची गरज आहे. लोकांमधील प्रतिकाराची शक्ती परिस्थितीला बदलवू शकते. त्यामुळे लोकतंत्रच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन अमरनाथ भाई यांनी केले.