महावितरण तथा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष वर्धा : शहरालगतच्या सालोड येथे एका भूखंडाववरून विद्युत प्रवाहित तारा गेल्या आहेत. सदर भूखंडावर बांधकाम करावयाचे आहे; पण वीज तारांचा अडथळा होत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भूखंडधारकाची गोची झाली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उत्तम मुरलीधर चांदेकर रा. सालोड (हि.) यांच्या मालकीचा तेथील शेत सर्व्हे क्र. जुना ३८०/३ मौजा क्र. १३६, प.ह.नं. १६ येथील भूखंड क्र. ३/२ हा भूखंड आहे. या भूखंडावर बांधकाम करायचे आहे; पण भूखंडावरून वीज तारा गेलेल्या आहेत. यामुळे बांधकाम करताना अडथळा निर्माण होत आहे. उत्तम चांदेकर यांना सदर भूखंडावर व्यवसायासाठी दुकानाचे बांधकाम करायचे आहे. सदर भूखंडामधून विद्युत तारा गेलेल्या असल्याने बांधकाम करणे जिकरचे झाले आहे. परिणामी, बांधकामात अडथळा निर्माण होत आहे. याबाबत चांदेकर यांनी सालोड ग्रा.पं. कार्यालयात सरपंचांना निवेदन सादर केले. यात बांधकाम करण्यासाठी विद्युत तारा काढण्याची मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय महावितरणकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे चांदेकर त्रस्त झाले आहेत. बांधकाम सुरक्षित पार पडावे म्हणून सदर तारा हटविणे गरजेचे झाले आहे. ग्रा.पं. प्रशासन व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी चांदेकर यांनी केली आहे. बांधकाम करताना शासकीय वीज तारांचे नुकसान झाले वा माझ्या जीवितास धोका झाला तर संपूर्ण जबाबदारी ग्रा.पं. प्रशासनाची राहील, असा इशारा निवेदनातून देण्या आला आहे. याकडे लक्ष देत तारा हटवाव्यात, अशी मागणीही चांदेकर यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
भूखंडावरील वीज तारांचा बांधकामात अडथळा
By admin | Published: March 15, 2017 1:43 AM