लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मौजा गौळ शेतशिवारातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार पद्माकर भोयर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. जलसंधारण विभागाचेवतीने ही कामे केली जात आहे.या कामात संबंधीत ठेकेदारांकडून मनमानी होत आहे, असा आरोप करून या बांधकामची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गौळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.मौजा गौळ शिवारात ३५ लाखाच्या खर्चातून नाला सरळीकरण तसेच पद्माकर भोयर व बाबाराव आकोटकर यांच्या शेताजवळ प्रत्येक एक याप्रमाणे दोन बंधाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. या शेतशिवारातील तिन्ही कामे निकृष्ठ दर्जाची तसेच नियमबाह्य पद्धतीची होत आहे. बंधाऱ्याचे बांधकामात दगड व माती भरून गैरप्रकाराचा कळस गाठला जात आहे. बंधाऱ्याच्या बांधकामात जागोजागी तडे गेल्याने कामाची गुणवत्ता संशयित ठरली आहे. ही सर्व कामे लोकवस्तीचे बाहेर शेतशिवारात असल्याने संबंधीत ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे. नाला सरळीकरण व बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करून दिशाभूल केली जात आहे. कास्तकारांच्या वहिवाटीसाठी बंधाऱ्यावरून रस्ता न दिल्याने पावसाळ्याचे दिवसात अडचण निर्माण झाली आहे. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले असता उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहे.हा सर्व गैरप्रकार संबंधित ठेकेदार व जलसंधारण अधिकाऱ्यांच्या साटेलोट्यातून होत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. शिवाय या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधीत ठेकेदार उके कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूर यांंचेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मौजा गौळ शिवारातील पद्माकर भोयर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
बांधकामाला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:53 PM
मौजा गौळ शेतशिवारातील नाला सरळीकरण व सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची तक्रार पद्माकर भोयर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. जलसंधारण विभागाचेवतीने ही कामे केली जात आहे.
ठळक मुद्देउच्चस्तरीय चौकशीची मागणी : शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार