अमोल सोटेलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामांत विविध पीक घेऊन उत्पन्न दुप्पट करता यावे, या हेतूने शासनाकडून धडक सिंचन विहीर योजना कार्यान्वित करण्यात आली; पण निधीअभावी शासनाची ही योजना पांढरा हत्ती ठरू पाहत आहे. आर्वी उपविभागातील तब्बल ३३५ सिंचन विहिरींचे बांधकाम निधीअभावी अर्धवट असून, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.आर्वी उपविभागात आर्वी, आष्टी, तसेच कारंजा (घा.) तालुक्यांचा समावेश असून, या तिन्ही तालुक्यांतील ३३५ विहिरींचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाकांशी ठरणाऱ्या या योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामांनाही ब्रेक लागला आहे. कोरडवाहू शेतीही सिंचनाखाली यावी या हेतूने, तसेच स्वतंत्र सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून शासनाने धडक सिंचन विहीर योजना उपक्रम हाती घेतला. आपल्यालाही विहीर मिळेल म्हणून शेतकरीवर्ग समाधानी झाला होता; पण सध्या निधीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.विशेष म्हणजे, शासनाने टप्प्याटप्प्याने सिंचन विहिरीचे अनुदान वितरित करायला सुरुवात केली होती. मात्र, अलीकडच्या काळात हे सर्व खितपत पडल्यामुळे शेतकऱ्यांनी उसनवारीने, सावकाराकडून पैसे आणून बांधकाम केले. मात्र, त्यांना काहीही पैसे मिळालेले नाहीत. परिणामी, अनेक विहिरी अर्धवट स्थितीत आहेत, हे विशेष.
तिन्ही यंत्रणा आल्या अडचणीत- धडक सिंचन विहीर बांधकामासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग, अशा तीन स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाकडून निधी प्रलंबित असल्यामुळे या तिन्ही यंत्रणा अडचणीत आलेल्या आहेत. शेतकरी वारंवार शासकीय कार्यालयाला घिरट्या घालून साहेब निधी कधी येणार, अशी विचारणा करीत असल्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले आहेत.
धडक सिंचन विहिरीच्या अर्धवट बांधकामाच्या अनुदानासंदर्भात शासनाकडे मागणीचे प्रस्ताव वारंवार पाठविण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून निधी आला नसल्याने शेतकऱ्यांचे सर्व बांधकाम प्रलंबित आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे; पण निधी कधी येईल, हे निश्चित सांगता येत नाही.- विनीत साबळे, उपविभागीय अभियंता, जि.प. लघुसिंचन, उपविभाग, आर्वी