तहसील कार्यालयाचे भिजत घोंगडे : तीन वर्षे सहा महिन्यांपासून कार्यालय भाड्याच्या इमारतीत सेलू : गत साडेतीन वर्षांपासून येथील तहसील कार्यालयाचा कारभार भाड्याच्या इमारतीतून चालत आहे. कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम चार वर्षे लोटूनही अर्धवटच आहे. या बांधकामाची कासवगती पाहता आणखी किती वर्षे तालुक्याचा कारभार या भाड्याच्या इमारतीतून चालणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाकरिता २३१.४५ लक्ष रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर २४५.३२ लक्ष रूपयाची तांत्रिक आणि २२९.८७ लक्ष रूपयाचा करारनामा होताच हे काम नागपूर येथील एका कंत्राटदाराकडे देण्यात आले. ३० मार्च २०१३ ला पासून कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या बाजूला इमारत उभारण्यात येत आहे. या बांधकामाला सुरुवात होताच नोव्हेंबर २०१३ मध्ये विकास चौकातील दुकानासाठी बांधलेल्या गाळ्यामध्ये कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. याला साडे तीन वर्ष झाले. या कालावधीत तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतरीत करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्याचा प्रशासकीय कारभार किरायाच्या इमारतीतून चालत आहे. या बांधकामावर बांधकाम विभागाची देखरेख आहे. सदर बांधकाम ३० एप्रिल २०१४ ला पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र कामाची कासवगती पाहता बांधकाम विभागाने दिलेला कालावधी चुकीचा तर नाही, अशी शंका व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)
चार वर्षांपासून बांधकाम रखडले
By admin | Published: April 20, 2017 12:51 AM