लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भावर आलेल्या कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने वर्धा शहराशेजारी १ हजार ५०० बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल तयार करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला गती दिली जात आहे. यासाठी काही इमारती जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या असून, अधिग्रहित इमारत असलेल्या सुरेश देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वाचनालयाच्या आवारात सुसज्ज असे आयसीयू युनिट उभे करण्याचा मानस आहे. या आयसीयू कक्षात किमान ५० टन क्षमतेचे वातानुकूलित युनिट बसविण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग तसेच त्यामुळे दररोज बाधित होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, भविष्यात वैद्यकीय सुविधा कमी पडू नये यासाठी वर्धा शहराशेजारील उत्तम गलवा स्ट्रील निर्मिती प्रकल्पाजवळील सुरेश देशमुख इंजिनिअरिंग कॉलेज आणि लॉयड्स विद्या निकेतनची इमारत जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केली आहे. या अधिग्रहित इमारतीत किमान १ हजार ५०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री सुनील केदार यांनी मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर हालचालीही केल्या जात आहेत. विशेष म्हणजे हे जम्बो कोविड रुग्णालय जनतेच्या सेवेत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहे. अधिग्रहित केलेल्या इमारतीपैकी सुरेश देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजच्या वाचनालयाच्या परिसरात किमान ५० टन क्षमतेचे एससी युनिट लावून तेथे अतिदक्षता कक्ष तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. असे असले तरी विविध विभागाकडून अजून इत्थंभूत माहिती तसेच प्रारूप आराखडा कसा असावा, हे तयार करून जबाबदार अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला नाही. पण येत्या काही दिवसात प्रारूप आराखडा तयार होईल आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होईल, असे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
वाढविली जाणार विद्युत क्षमता
ज्या अधिग्रहित इमारतीत जम्बो कोविड रुग्णालय तयार होणार आहे, त्या ठिकाणी जास्त क्षमतेने विद्युत पुरवठा दिला जाणार आहे. त्यासाठी महावितरणचे अधिकारी विशेष प्रयत्न करणार आहेत. असे असले तरी नेमकी किती विद्युत या ठिकाणी दररोज लागेल, याची माहिती अद्यापही महावितरणला देण्यात आलेली नाही. पण जम्बो काेविड रुग्णालयाला मागणीनुसार पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा देण्याची तयारी महावितरणची असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य सोयींचा होतोय विस्तार
कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात एकूण ९९० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात सेवाग्राम रुग्णालयात २९२, सावंगीत ५०८, हिंगणघाट येथे शासकीय व खासगी रुग्णालय मिळून ६०, आर्वीत ३० तर जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे १०० खाटांची व्यवस्था आहे. याशिवाय सावंगी रुग्णालयाच्याच आयुर्वेद महाविद्यालयात १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय शासनाचे नवे जम्बो कोविड रुग्णालय सुरू होत आहे. भाजपच्या वतीने १५ पोर्टेबल व्हेंटिलेटर व एक व्हेंटिलेटर हिंगणघाट, आर्वी, वर्धा येथील शासकीय रुग्णालयांना देण्यात आले आहे. एकच मिशन शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांचेही आर्वी येथील ४० बेड कोविड केअर सेंटर ऑक्सिजन सोयीयुक्त लवकरच सुरू केले जात आहे.