तक्रारीकडे दुर्लक्ष : जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास झडशी : सेलुकडून झडशीकडे येणाऱ्या मार्गावर वडगाव नजीक काही दिवसांपूर्वी पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात आले. यामुळे वाहन चालक तसेच प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी या पुलाकरिता वापरात आणलेले बांधकाम साहित्य पुलावरच पडून आहे. त्यामुळे येथून आवागमन करताना वाहन धारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलावर पडून असलेल्या रेती व गिट्टीमुळे दुचाकी सारखे वाहन घसरते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम साहित्य पुलाच्या मध्याभागी टाकल्याने येथून वाहन काढताना चालकांची कसरत होत आहे. याबाबत परिसरतील नागरिकांनी काम सुरु असताना संबंधित कंत्राटदाराला सांगितले. परंतु कंत्राटदराने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत वेळकाढुपणा केला. बांधकाम साहित्य वेळीच उचलले नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग परिसरातील ग्रामस्थांना तालुकास्थानी जोडणारा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथे वर्दळ असते. अशात बांधकाच्या साहित्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी या मार्गाने प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे.(वार्ताहर)
बांधकाम साहित्य रस्त्याच्या मध्यभागी
By admin | Published: April 23, 2017 2:11 AM