लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधींच्या निधीतून रस्ता व पुलांचे बांधकाम झाले आहे. अनेक कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून लवकर कामांना सुरुवातही होणार आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्त्यावरील ८५.२८ कोटींच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच शेडगाव चौरस्त्यावरील ४७.७८ कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाजी मार्केट यार्डच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, आमदार समीर कुणावार, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे. आ. डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे यांची उपस्थिती होती. वणा नदीचे खोलीकरण करणे गरजेचे आहे, असे मत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले. त्यावर बोलतना ना. गडकरी यांनी वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरुच करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे ना. पोहोचले आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच कलोडे भवन चौक व उपजिल्हा रुग्णालय चौकातील उड्डापुलाला मंजुरी देण्याची घोषणाही केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही केल्यात.यावेळी खासदार रामदास तडस यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर सुत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. उपस्थितांचे आभार नीलेश येवतकर यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी ना. गडकरी यांचे स्वागतही केलेत.
बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा- ना. नितीन गडकरी यांनी हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करुन बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता शीतगृहाचे बांधकाम करण्याकरिता तसेच बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे हीे शक्य आहे, असे सांगून याकरिता सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिलेत.