वर्धा : गॅस धारकांना देय असलेली सबसिडीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बंद केलेली प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी गॅसधारकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. वर्षभरापूर्वी ही प्रकीय सुरू करण्यात आली. तेव्हा अनेकांनी बँक खाते काढले. परंतु पद्धती बंद झाल्याने नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु नव्याने खात्यात सबसिडी जमा करणे सुरू केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील गॅस ग्राहकांचे अद्याप बँकेत खातेसुद्धा नसल्याचे दिसून येत आहे. सबसिडीची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने बँक खात्यासोबतच सदर खात्यास आधार कार्ड नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ज्यांनी आधार कार्ड नोंदणी केली नसेल त्यांनी ती करून आपल्या बँक खात्यास संलग्न करून घ्यावयाची आहे. याची जिल्ह्यातील सर्व गॅसधारकांनी नोंद घेऊन आधार कार्ड व संलग्न बँकखाते उघडून संबंधित गॅस एजन्सीला कळवावे, असे प्रशासनाद्वारे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप अनेक ग्राहकांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांनी आधार कार्ड वेळेत काढून घेणे गरजेचे आहे. तरीसुद्धा ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही. त्यांनाही सबसिडीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी किमान बँकेत खाते असणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागातील असंख्य गॅस ग्राहकांकडे बँकेचे खाते नाही. सुरुवातीला अशा ग्राहकांना शासनाकडून मुदत मिळण्याची शक्यता आहे. या मुदतीत आपले बँक खाते काढून गॅस एजन्सीसोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतरच गॅसच्या सबसिडीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. परंतु दिलेल्या मुदतीनंतरही ज्यांनी आपले बँक खाते उघडून गॅस एजन्सीसोबत न जोडल्यास अशा ग्राहकांना भविष्यात सबसिडीपासून वंचित राहावे लागून बाजार भावाने स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागू शकते.(शहर प्रतिनिधी) योग्य माहितीचा अभावाशासनाकडून वारंवार स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत माहिती देण्यात येत असली तरीसुद्धा अद्याप ग्रामीण भागात मात्र पुरेशा प्रमाणात याबाबत जनजागृती झालेली नाही. संबंधित एजन्सीकडून याबाबत फारसे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसून येतात. सबसिडी खात्यात जमा करण्याची प्रक्रीया शासनाकडून बंद करण्यात आली. परंतु ती नव्याने सुरू करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जानेवारी महिना सुरू होण्यासाठी केवळ तीन दिवस बाकी आहेत. नागरिकांनी स्वत:हून माहिती घेऊन या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि शासनाच्या गॅस अनुदानाचा फायदा घेणे आवश्यक आहे. परंतु अद्यापही याबाबत ज्या नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली नाही अशा नागरिकांपर्यंत योग्य माहिती वेळेत पोहचवून त्यांना या अनुदानाचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासन व संबंधित गॅस एजन्सीची आहे. यांच्याकडून मात्र फारशी क्रियाशिल भूमिका बजाविली जात नसल्याचे दिसून येत आहे.
गॅस सिलिंंडर सबसिडीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम कायम
By admin | Published: December 27, 2014 10:58 PM