मोझरी (शे.) : नजीकच्या कानगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेत कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे कामाची गती मंदावली आहे. बाहेरगावावरून कामे पार पाडण्यासाठी येणाऱ्या नागरिक वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. येथे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. सध्या बी-बियाणे खरेदी व लागवडीसाठी शेतकरी वर्ग कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहे. कर्ज प्रकरणे मंजूर व्हावी याकरिता अनेकदा बँकेत चकरा माराव्या लागत आहे. परंतु शेतकऱ्यांची प्रकरणे गतीने पुढे सरकत नसल्याचे दिसत आहे. वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.कानगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतरण झाले. पण सुसज्ज इमारतीमध्ये बऱ्याच असुविधा बघायला मिळतात. येथे कॅश काऊंटरसाठी एकच खिडकी उघडी राहत असल्यामुळे पैसे काढण्यासाठी तसेच भरण्यासाठी ग्राहकांना तासनतास उभे रहावे लागते. महत्त्वाच्या कामासाठी आलेल्यांचा संपूर्ण दिवस बँकेतच जातो. या शाखेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.जवळपास २२ गावांचा कारभार या बँकेमार्फत चालतो. त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांचे, वृद्धांचे मोठे हाल होत आहेत. येथील बँक कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील ग्राहकांची कामे मात्र मागच्या खीडकीतून लवकर होत असल्याची ओरड ग्राहक करीत आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढवून ग्राहकांचा होणारा त्रास कमी करावा अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची परवड
By admin | Published: June 30, 2014 12:04 AM