लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्युहातून युवकांना बाहेर काढून तरुणांना तंबाखू व निकोटिन वापरण्यापासून प्रतिबंधित करणे ही यावर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. देशात दरदिवशी ३ हजार ५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मृत्युमुखी पडत आहे. रविवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी चिंतित करणारी आहे.सलाम मुंबई फाऊंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. शासनही तंबाखूमुक्त शाळांचे ध्येय १०० टक्के साध्य करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून ८ राज्यातील १ लाख ३७ हजार २३ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. ५८५ सेवाभावी संस्थादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण ३१ हजार ७०७ शाळां तंबाखूमुक्त झालेल्या आहेत.युवावर्गाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि युवापिढीचे आरोग्य बाधित ठेवण्यासाठी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन २०२० ची मोहीम सलाम मुंबई फाऊंडेशन, शिक्षण विभाग संयुक्तरीत्या राबविणार आहे.३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी वचनबद्ध होऊन, आपल्या देशातील भावी पिढीला तंबाखूच्या चक्रव्युहातून बाहेर काढले पाहिले.आपल्या देशातील भावी पिढी सुजाण आणि सशक्त करण्यासाठी सर्व शाळा या तंबाखू मुक्त असायला हव्यात. युवक ही भारताची शक्ती आहे. आणि ही शक्ती सशक्त आणि तंबाखुमुक्त असायला हवी यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यायला हवा.आजघडीला संपूर्ण देश कोविड-१९ या महामारीने ग्रासलेला आहे. तंबाखू सेवनाने कोरोनाचा प्रसार अधिक होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एकत्र येत तंबाखू सेवन विरोधी मोहीम अधिक मजबूत करायला हवी. आपली शाळा, घर, गाव आणि परिसर तंबाखूमुक्त करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.-डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य विभाग.
दरदिवशी साडेपाच हजार युवकांकडून पहिल्यांदा सेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM
अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात.
ठळक मुद्देजागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन; समाजातील सर्वच घटकांचा पुढाकार गरजेचा