वर्धा : अवैधरित्या जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात होऊन सुमारे १५ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर ६० जनावरे गंभीर जखमी झाले. हा अपघात सिंदी (रेल्वे) नजीकच्या महामार्ग ७ वर झाला. जखमी जनावरांवर वर्ध्यातील करुणाश्रमात उपचार सुरू असल्याची माहिती असून अपघातस्थळावरून कंटेनर चालक व वाहकाने पळ काढल्याची माहिती सिंदी पोलिसांनी दिली.
मध्य प्रदेश येथून निघालेल्या एम.पी. ०४ एचई. ९६६४ क्रमांकाच्या कंटेनरचा अपघात झाल्याची माहिती पोलीस कंट्राेल रुमला मिळाली. कंट्राेल रूममधील पोलिसांनी याची माहिती सिंदी पोलिसांना दिली. दरम्यान कंटेनर हा एका मालवाहू वाहनाला धडक देऊन अपघात झाल्याचे पोलिसांना समजले. तसेच पोलीस दिसताच चालक व वाहनाने तेथून पळ काढला. पोलिसांना कंटेनरमधून आवाज येत असल्याने यात नेमके आहे तरी काय, हे पाहण्यासाठी पोलिसांनी कंटेनरच्या आतील खिडकीतून डोकावून पाहिले असता सुमारे ६० ते ७० जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले.
त्या सर्व जनावरांना वर्ध्यातील करुणाश्रमात दाखल केल्यावर त्यातील १५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून आले. तर ६० जनावरांवर करुणाश्रमात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाव घेत पंचनामा करून कंंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.