नागरिकांचे आरोग्य धोक्यात : व्हॉल्वमधून गटाराचे पाणी नळात कारंजा (घाडगे) : येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नागरिकांना येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात नागरिकांच्या घरून निघाणारे सांडपाणी येत असल्याने ते दुषित होत असल्याचा आरोप आहे.कारंजा हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिवाय तालुक्यातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला खैरी येथील कार नदीवरील प्रकल्पातून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. पिण्याकरिता व वापराकरिता भरपूर प्रमाणात धरणात पाणी उपलब्ध असूनही येथील नागरिकांना तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. शुध्द पाणी पुरवठ्याच्या अपेक्षेत असलेल्या नागरिकांना कधी पिवळसर तर कधी हिरवट पाणी येत आहे. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये पाणी पुरविण्याकरिता मुख्य मार्गावर पाणी पुरवठा करणारा व्हॉल आहे. या व्हॉलमधून परिसरातील नागरिकांच्या घरून रस्त्यावर वाहणारे दुषित पाणी, सांडपाणी या व्हॉल मध्ये शिरते. तेच पाणी या वॉर्डाला पुरविल्या जाते. शिवाय याच मुख्य रस्त्यावर उकीरडा सुध्दा आहे. याबाबत नुकतेच निवडणुकीत कारंजा वासीयांचे चांगले दिवस येतील म्हणून मत मागणारे सत्तारुढ पार्टीचे सदस्य कुठे गेले अशी नागरिकांची ओरड आहे.वॉर्डात जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असल्याने येथे साचलेल्या पाण्याणे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्यांना येथे पाय अडकून पडावे लागले आहे. मुख्य बाजारपेठेला लागून असल्याने या व्हॉल जवळच नागरिक लघुशंकेकरिता बसतात. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ६ वासीयांना हे दुषित पाणी पुरविल्या जाते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष पुरवून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची मागणी नागरिकांची आहे. (शहर प्रतिनिधी)
कारंजात होतो दूषित व गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा
By admin | Published: June 24, 2014 12:00 AM