वीज ग्राहकांचा रोष : कामगारच करताहेत कारवाईची मागणीसेलू : येथील वीज वितरण कंपनीत ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. ठेकेदार मनात येईल त्याप्रमाणे नियमबाह्य कामे करीत असल्याचे बोलल्या जात आहे. नाममात्र कामांचे लाखो रूपये उकळल्या जात आहे. त्यामुळे वीजग्राहकांत असंतोष पसरला आहे. सबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी खुद्द कर्मचारी व ठेकेदाराकडून कामगारच करीत आहेत. येथील वीज वितरण कंपनाच्या ठेकेदारांचा उर्मटपणा वाढत चालला आहे. माझ्या केसालाही वरिष्ठ अधिकारी धक्का लावीत नाही, कारण त्यांचे तोंड मी बंद करतो असे उघडपणे बोलणाऱ्या ठेकेदारालाही वीज वितरण कंपनी पोसत असल्याचे बोलल्या जात आहे. मागील वर्षी एका शेतकऱ्यांकडून स्वत:च्या नावाने ४५ हजार रुपयांचा धनादेश काढून रक्कम हडप करण्यात आली. पैसे उकळल्यावरही वर्षभर त्यांच्या शेतात वीजजोडणी दिली नाही. अखेर लोकमतने ही बाब चव्हाट्यावर आणताच दुसऱ्याच दिवशी सदर शेतकऱ्याला वीज पुरवठा मिळाला होता. असे अनेक प्रकार येथे नित्याचेच झाल्याचेही बोलल्या जात आहे. यंदाही संपूर्ण उन्हाळभर ठेकेदारांनी जुजबी कामांची भरमसाठ देयके काढून महावितरणची लुबाडणूक करण्यात आली. परिणामी वाऱ्याची झुळक आली तरीसुद्धा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार ग्राहकांचा संताप वाढवित आहे. भर उन्हाळ्यात ठेकेदारांनी मनमानी सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना व शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. खुद्द उपकार्यकारी अभियंता संजय पुरी यांनीच ठेकेदारांना वठणीवर आणण्याची गरज व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर ठेकेदाराजवळ काम करणारे कामगारही ठेकेदारावर रोष व्यक्त करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
वीज वितरण कंपनीत ठेकेदाराची मनमानी
By admin | Published: July 02, 2016 2:25 AM