वर्धेतील १४ गट : उमेदवारांच्या प्रतिनिधींची उपस्थिती वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. यामुळे प्रशासनानानेही कामाची गती वाढविली आहे. तालुका स्तरावर असणाऱ्या गट व गणांकरिता निवडणूूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याकरिता काम सुरू झाले आहे. वर्धेत रविवारी क्रीडा संकुलाच्या सभागृहात तालुक्यातील जि.प.च्या १४ गटांसाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत २०० कंट्रोल युनिट व २०९ बॅलेट युनिट सील करण्यात आले. यावेळी १० टक्के राखीव मशीनही सील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भुगावकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कदम, तहसीलदार मनोहर चव्हाण, नायब तहसीलदार राऊत यांच्या उपस्थितीत आज १४ टेबलवरून कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सील करण्याचे काम सुरू झाले. सदर मशीना सील करताना उमेदवारांचे प्रतिनिधी बऱ्यापैकी उपस्थित होते. रविवारी सायंकाळपर्यंत मशीना सील करून सुरक्षीत ठिकाणी ठेवण्यात आल्या. मशीन सील करताना कर्मचाऱ्यांनी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटमध्ये काही तांत्रिक बिघाड तर नाही ना याची शहानिशा केली. या कामाकरिता एकूण ८० कर्मचाऱ्यांचे सहकार्य होते. (शहर प्रतिनिधी) एसएमएसद्वारे करून दिले स्मरण निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन कंट्रोल व बॅलेट युनिट सील करण्याची माहिती उमेदवारांपर्यंत झटपट पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. याची माहिती देण्याकरिता उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविण्यात आले. निवडणुकीच्या काळात उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी व्यस्त असतात त्यामुळे त्यांना यंत्र सील करण्याच्या दिवशीची व वेळेची माहितीची स्मरणात राहावी म्हणून त्यांना वेळोवेळी एसएमएस पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपस्थितांच्या घेतल्या स्वाक्षऱ्या आज सकाळपासूनच क्रीडा संकुलाच्या सभागृहात कंट्रोल व बॅलेट युनिट सील करण्यात आले. यावेळी मशीनांमध्ये काही तांत्रिक बिघाड तर नाही याची शहानिशाही उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली असून त्यांची एका अर्जावर स्वाक्षरी घेण्यात आली. सोमवारी २८ गणांचे यंत्र सील रविवारी वर्धा तालुक्यातील १४ गटासाठी मतदान यंत्र सील झाले, तर उद्या सोमवारी २८ गणासाठी कंट्रोल व बॅलेट युनिट सील करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी सांगितले.
कंट्रोल व बॅलेट युनिट सील
By admin | Published: February 13, 2017 12:33 AM