वर्धा : जवळपासच्या गावी जाण्यासाठी बहुतेक नागरिक हे बसला प्राधान्य देतात. किंबहुना तोच एक साधा व सोपा पर्याय प्रवाश्यांपाशी असतो. त्यामुळेच प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे नामाबिरूद एस. टी. आगाराने धारण केले आहे. पण ही सेवा भर उन्हाळ्यात पाण्यासारखीच आटल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यातील बहुतेक बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची तोकडी सुविधा आढळून येते. अनेक ठिकाणी जलप्याऊ आहे म्हणायलाच उभे आहेत पाण्याच्या टाकींची स्वच्छता होत नाही. पाणी पिण्यासाठी गेले असता प्रवाश्यांना कोरडाच हात ठेवत माघारी फिरावे लागते. उन्हाचा दाह वाढत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान पाण्यासाठी प्रवाश्यांची भटकंती सुरू होते. पाण्याची स्वच्छता किती किंवा ती होते का याबाबत तर विचारूच नये अशी स्थिती आहे. ज्या स्थानकावर पाण्याची व्यवस्था आहे तिथे सध्या पाणी पिताना आधी हात भाजेल अशी अवस्था आहे. त्यामुळे पाणी असूनही ते पिता येत नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील बहुतेक बस्थानकावर हाच प्रकार पहावयास मिळतो. त्यामुळे एस ती आगार मिरवत असलेले प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रिद नेमक्या कुठल्या सेवेसाठी हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. सर्वच ठिकाणी थड पाण्याचे पाऊच, बाटलीबंद पाणी विकत स्वरुपात सहज स्वरुपात मिळते. त्यामुळे चार दमड्या खिशात असलेल्यांना पाण्याच्या सुविधेबाबत कुठलाही प्रश्न पडत नसला तरी सामान्य नागरिकांवर मात्र अनेकदा घसा कोरडा ठेवण्याचीच वेळ येत आहे.
बसस्थानकांवर थंड पाण्याचा ठणठणाट
By admin | Published: March 31, 2016 2:42 AM