लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सोमवारी आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील एका ३८ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा नवीन कोरोना बाधित व्यक्ती पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या नटाळा येथील कोरोना बाधितांकडे शेतीची मोजण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आला होता. आर्वीच्या भूमिअभिलेख कार्यालयातून शेत मोजणीसाठी गेलेला कर्मचारी कोविड निगेटिव्ह आला असला तरी त्याच्या निकट संपर्कात आलेल्या या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पिपरीच्या लग्नानंतर जिल्ह्यात कोरोना स्प्रेड तर होत नाही ना असा अंदाज आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, पिपरी (मेघे) येथील लग्न सोहळ्याला आर्वी तालुक्यातील नटाळा बोथली येथील दोन युवती सहभागी झाल्या होत्या. नवरदेवाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नवरदेवाच्या निकट संपर्कातीलल ३० व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आर्वी तालुक्यातील नटाळा बोथली येथील दोन युवतींनाही कोरोना संसर्ग झाल्याचे पुढे आले. ही बाब लक्षात येताच नटाळा बोथली येथे याच युवतींच्या घरी शेत जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या आर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याने आणि या कर्मचाऱ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या एका कर्मचाऱ्याने रुग्णालयात धाव घेऊन कोविड चाचणी केली. या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे सोमवारी पुढे आले आहे. हा कोरोना बाधित नटाळा बोथली येथे शेत मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाºयाच्या निकट संपर्कात आल्याचे अधिकाऱ्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.भूमिअभिलेख कार्यालयातील १९ व्यक्तींचे घेतले जातेय स्वॅबआर्वी येथील भूमिअभिलेख कार्यालयात एकूण १९ व्यक्ती कार्यरत आहेत. याच कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आर्वीच्या भूमिअभिलेख कार्यालयात वर्धा तालुक्यातील रहिवासी असलेले चार कर्मचारी कार्यरत असून तालुका आरोग्य प्रशासनाकडून या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.आर्वीत आढळलेला नवीन कोरोना बाधित हा नटाळा बोथली येथे शेत जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याच्या निकट संपर्कात आला होता. असे असले तरी शेजमोजणीसाठी गेलेल्या व्यक्तीचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे. पिपरी येथील लग्नानंतर वर्ध्यात कम्युनिटी स्प्रेड होत आहे असे म्हणणे चुकीचे होईल; पण सध्या या नवीन रुग्णाची हिस्ट्री जाणून घेतली जात असून नागरिकांनीही लक्ष राहून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.
वर्धा जिल्ह्यातील पिपरीत एका लग्नसमारंभानंतर झाला कोरोना ब्लास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:50 PM
आर्वीच्या भूमिअभिलेख कार्यालयातून शेत मोजणीसाठी गेलेला कर्मचारी कोविड निगेटिव्ह आला असला तरी त्याच्या निकट संपर्कात आलेल्या या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पिपरीच्या लग्नानंतर जिल्ह्यात कोरोना स्प्रेड तर होत नाही ना असा अंदाज आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
ठळक मुद्देमोजणी करणाऱ्याच्या आला संपर्कात