लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासच नसल्यामुळे सध्या पुस्तके उघडण्याऐवजी फक्त खेळण्यातच व्यस्त आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे.
कोरोना या महाभयंकर विषाणूचा देशात शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असेत, तर घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेला गृहपाठ करण्यात व्यस्त राहत असे; परंतु कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून सर्वच शाळा बंद करण्यात आल्या व यावर्षीच्या सत्रात शाळा सुरू न झाल्यामुळे त्यांचा दिनक्रमच बदलल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी निव्वळ खेळण्यातच दंग राहत आहेत. मागील एक-दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली काही लहान मुले तर चक्क शाळेत शिकलेली अक्षर ओळख व इंग्रजी वर्णाक्षरेसुद्धा विसरली आहेत. पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षीच्या सत्रात शाळा बंदच राहील की काय? असा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. एकंदरीत कोरोनामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील हे अनिश्चित आहे. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात व खेळण्यात बेभान झाले आहेत, तर शिकलेला काही अभ्यासक्रम विसरले आहेत. अभ्यास करण्याबाबत त्यांना म्हटल्यास शाळा बंद आहे हे कारण सांगून, ते काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे.
अंबादास खवशी, पालक, किन्हाळा (जसापूर)
कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आकलन क्षमतेच्या बाहेर गेला असून, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकाला येणाऱ्या काळात बरीच मेहनत घ्यावी लागेल. शाळा अजूनही बंद आहेत. पालक व शासनाच्या समन्वयातून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा करावा.
रवींद्र कोहळे, पालक, तळेगाव (शा.पं.)