लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोरोनाचा हाहाकार असतानाही वर्ध्यातील प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरविण्यास संधीच मिळाली नाही. परिणामी, राज्यभरात सर्वांत कमी रुग्णसंख्या वर्धा जिल्ह्यात आहे. येथे कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर ११७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगार हिरावल्यामुळे अनेकांनी घराचा रस्ता धरला. जिल्ह्यातही तब्बल ५० हजार व्यक्ती बाहेर जिल्हा-राज्यातून दाखल झाल्या आहेत.
बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सोळावर पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाने बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यावर भर दिला आहे. ज्यांच्याकडे व्यवस्था नाही, अशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ५२ हजार ८६० व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४७ हजार ५३१ व्यक्तींचा गृह विलगीकरणाचा कार्यकाळ संपला असून सध्या ५ हजार ३२९ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. सध्या ई-पासद्वारे जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून नागरिक क्वारंटाईन होण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेली एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यास अख्खा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने इतर नागरिकांना विनाकारण १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची वेळ येते. ही अडचण टाळण्यासाठी आता सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक, तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केले आहे. त्यामुळे आता संस्थात्मक विलगीकरणाची आकडेवारीही वाढणार आहे.
४ हजार १८१ व्यक्तींची केली चाचणीकोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ४ हजार १८१ व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४ हजार ११५ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ४ हजार ८० अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप ६६ अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यामध्ये १६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
११ व्यक्ती कोरोनामुक्तजिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे या महामारीच्या काळात जिल्ह्यामध्ये १६ रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वच रुग्ण बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. यातील ११ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ अॅक्टिव्ह रुग्ण असून तिघांवर जिल्ह्यात तर एकावर नागपुरात उपचार सुरू आहेत.