लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीला तब्बल ५० दिवस ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात आता कोरोना रुग्ण वाढीला लागले असून मंगळवारी जिल्हा कोरोना रुग्णांबाबत अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारी सात नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैकी पाच जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी असून एक यवतमाळ तर एक वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ४९ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शिवाय एकाचा कोरोनाने तर एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याबाहेरील दहा कोरोना बाधितांवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ७९ कोरोना बाधितांची नोंद घेतली आहे. त्यापैकी ४९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून ३० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या पाच व्यक्तींचा वर्ध्यात मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघे जिल्ह्याबाहेरील असून वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आहेत. या दोन व्यक्तींपैकी केवळ आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा कोरोनाने तर इतर दुसऱ्या व्यक्तीचा इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ४९ कोरोना बाधितांपैकी १५ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर जिल्ह्याबाहेरील ३० व्यक्तींपैकी १८ व्यक्तींनी कोरोनाला हरविल्याने त्यांना सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यातील दोन कोविड रुग्णालयात सध्या कोरोनाचे एकूण ४२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी ३२ व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील तर १० व्यक्ती जिल्ह्याबाहेरील आहेत. मंगळवारी आढळलेल्या जिल्ह्याबाहेरील दोन्ही रुग्णांची माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाने यवतमाळ आणि वाशीम जिल्हा प्रशासनाला दिली आहे.६९ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षाआतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सेवाग्राम, सावंगी येथे कोविड चाचणीची व्यवस्था आहे. तर काही विशेष किटही जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या असून त्याद्वारे लवकरच तपासणी सुरू होणार आहे.कस्तुरबा रुग्णालयात २१ अॅक्टीव्ह रुग्णसेवाग्राम : येथील कस्तुरबा कोविड रुग्णालय सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरत आहे. या रुग्णालयात सध्या २१ कोविड बाधितांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या रुग्णालयात आतापर्यंत ३६ कोरोना बाधितांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यापैकी १३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सध्या २१ कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहे. शिवाय उपचारादरम्यान दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. या ३६ कोरोना रुग्णांमध्ये वर्धा जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचा समावेश आहे.सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात १९ रुग्ण दाखलसावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सध्या १९ रुग्ण दाखल आहेत. तेथे मंगळवारी पाच नवे रुग्ण दाखल झालेत, सर्वांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील कोविड-१९ उपचार केंद्रात एकूण ३६ कोरोना बाधित दाखल झाले होते. सध्या २१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १३ व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.- डॉ. सुमित जाजू, नोडल अधिकारी,कस्तुरबा कोविड रुग्णालय.
वर्ध्यात कोरोनाचे अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM
आतापर्यंत एकूण ५ हजार ७७४ व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ५ हजार ७०५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून ५ हजार ६२७ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. तर सध्या ६९ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सेवाग्राम, सावंगी येथे कोविड चाचणीची व्यवस्था आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील ४९ व्यक्तींना संसर्ग : जिल्ह्याबाहेरील दहा रुग्णांवर उपचार सुरू