वर्धा : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे राज्यातही रोज नवे रूग्ण आढळत आहेत. मात्र वर्धा जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांपुढे कोरोनाही थांबला आहे. विदर्भातील होम क्वॉरंटाइनची पहिली केस वर्ध्यात झाली असतानाही वर्धा जिल्हा अद्याप कोरोनामुक्तच्या यादीत समाविष्ट आहे.चीनमधील वुहानमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच बीजिंग येथून १३ विद्यार्थिनी २ फेब्रुवारीला वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात पोहोचल्या. विद्यापीठ प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला माहिती देताच त्यांना वसतिगृहातच होम क्वॉरंटाईन करण्यात आले. १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत उपाययोजना सुरू केल्या. परदेशातून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून वर्ध्यात येणाऱ्यांची माहिती गोळा करायला सुरूवात झाली. परदेशातून आलेल्यांची तपासणी करून त्यांना आरोग्य यंत्रणेकडून होम क्वॉरंटाइन करण्यात आले. थोडेही लक्षण जाणवले की त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. होम क्वारंटाइनचे नियम तोडणाºया काही नागरिकांची दुकानेही प्रशासनाने सील केली. अशाप्रकारची राज्यातील ही पहिली कारवाई होती.‘या’ उपाययोजना ठरल्या प्रभावीलहान जिल्हा असतानाही वर्ध्यात सर्वांत आधी कलम १४४ लागू करण्यात आले. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या कोरोनाबाधित जिल्ह्यातील लोकांना जिल्हा प्रवेशास बंदी केली. वाहनांचे प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण करण्याचा अभिनव प्रयोगही जिल्ह्यात राबवला.विनाकारण फिरणारे तरूण व मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठांना ड्रोनच्या सहाय्याने टिपून दंडात्मक कारवाई केली. मजुरांना जेवण, निवाºयासोबतच त्यांचे मनोरंजन, योग, मानसिक संतुलनासाठी समुपदेशन केले जाते.होम अंडर क्वॉरंटाइनआतापर्यंत परदेशातून ११४ नागरिक जिल्ह्यात असून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेमधील डॉक्टर ते आशा वर्कर यांच्या सर्वेक्षणामुळे मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या १७ हजार ७०० नागरिकांना शोधून काढले. त्यांना होम क्वॉरंटाइन सोबतच त्यांच्या घरावरसुद्धा ‘होम अंडर क्वारंटाइन’चे स्टिकर लावले. त्यापैकी १५ हजार ७६९ लोकांचा होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाला आहे. उर्वरित नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
CoronaVirus: वर्धा जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांपुढे ‘कोरोना’ही थांबला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 5:25 AM